ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - सुमारे दीड महिने चाललेला आयपीएलचा हंगाम आटोपल्यानंतर आता भारतीय संघ पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज झाला आहे. यंदा इंग्लंडमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत आघाडीच्या निवडक संघांनाच प्रवेश देण्यात आल्याने या स्पर्धेतील चुरस वाढल्याचे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे.
या स्पर्धेतील गतविजेता असलेल्या भारतीय संघासमोर विजेतेपद राखण्याचे आव्हान आहे. तर महेंद्रसिंह धोनीकडून भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या विराट कोहलीच्या नेतृत्वाचा प्रथमच आयसीसीच्या जागतिक स्पर्धेत कस लागणार आहे. दरम्यान,
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी आज विराट कोहलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी विराट म्हणाला, "आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी क्रिकेटमधील आघाडीच्या मोजक्याच संघांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे या संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमधील स्पर्धात्मकता वाढली आहे."
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गतविजेत्या भारताची सलामीची लढत पाकिस्ताविरुद्ध होणार आहे. 4 जून रोजी होणाऱ्या लढतीमुळे सध्या क्रिकेटप्रेमींमधील उत्सुकता वाढली आहे. या लढतीबाबत विराट म्हणाला, "भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये रोमांचपूर्ण वातावरण असते. पण आमच्यासाठी फार काही बदलत नाही. आमच्यासाठी तो फक्त एक क्रिकेटचा सामना असतो."