नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघात समावेश झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याला संघाचे मालक विजय मल्ल्या यांच्या गोवास्थित बंगल्यात पाच दिवस राहण्याची संधी मिळाली आणि तो तेथे ‘राजासारखा’ राहिला आणि मल्ल्या यांची तीनचाकी हर्ले डेव्हिडसनदेखील चालविली. याचा उल्लेख गेल याने त्याचे आत्मचरित्र ‘सिक्स मशीन (आय डोंट लाईक क्रिकेट... आय लव्ह इट’)मध्ये केला आहे.आयपीएलमध्ये आरसीबीसाठी खेळताना गेल याने संघ व्यवस्थापक जॉर्ज अविनाश यांच्याकडून मल्ल्या यांच्या आलिशान बंगल्याविषयी ऐकले. दोन सामन्यांदरम्यान पाच दिवसांची विश्रांती होती, त्यामुळे गेल याने तेथे जाण्याची इच्छा व्यक्त केली. गेल म्हणाला, ‘मी तेथे जाण्याचा निर्णय घेतला. विमानतळावर कार मला घ्यायला आली आणि मी थेट तेथे पोहोचलो. तेथे हॉटेलपेक्षा मोठा बंगला होता आणि अशा खोल्या मी याआधी कधी पाहिल्या नव्हत्या. हा जेम्स बाँड, प्लेब्वायसारखा बंगला होता. मी पूर्ण बंगल्यात एकटाच होतो. दोन बटलर नेहमीच माझ्याजवळ असत. मी पहिल्यांदा पूलवर गेलो आणि नंतर लॉनमध्ये गेलो आणि पुन्हा पूलवर गेलो. किंगफिशर विला येथे कशाचीही कमतरता नव्हती. मी गोल्फकोर्टवरदेखील फिरलो. कुकला मी जेव्हा मेनू काय आहे असे विचारले, तेव्हा त्याने मला कोणताही मेनू नाही असे सांगितले. तुम्हाला जे हवे ते बनेल, असे कुक म्हणाला. मला त्या वेळेस मी जगाचा राजा आहे असे वाटले. मी हर्ले डेव्हिडसनही चालवली. विशेष म्हणजे याआधी कधी मोटारबाईकही चालवली नव्हती. तीनचाकी मोटरबाईक तर मी पाहिलीच नव्हती.’
मल्ल्यांच्या बंगल्यात ख्रिस गेलची ‘मौज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2016 4:02 AM