अॅडिलेड : भारताला आॅस्ट्रेलियातील परिस्थितीची चांगली माहिती आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत सहयजमान संघाला २६ मार्च रोजी सिडनीत होणाऱ्या स्पर्धेतील उपांत्य फेरीत आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, असे मत आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने व्यक्त केले आहे.आॅस्ट्रेलियाने शुक्रवारी येथे उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. त्यानंतर सेमी फायनलमध्ये भारताविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असेल, असे क्लार्कने मान्य केले. क्लार्क म्हणाला, ‘‘आॅस्ट्रेलियातील दौऱ्याच्या सुरुवातीच्या तुलनेत आता भारतीय संघ चांगला खेळत आहे. विश्वचषकाआधीही आपण भारताला पराभूत करणे कठीण असेल, असे म्हटले होते. त्यांचा संघ खूप चांगला आहे आणि त्यांनी आॅस्ट्रेलियात अधिक वेळ व्यतीत केला आहे. त्यामुळे त्यांना येथील परिस्थिती चांगली माहीत आहे. निश्चितच गुरुवारची लढत आव्हानात्मक असेल. त्यांना पराभूत करण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.विशेष म्हणजे, पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल् हकने पारंपरिक रूपाने फिरकी गोलंदाजीला अनुकूल असलेल्या सिडनीवर भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)तसेच, आॅस्ट्रेलियाकडे फिरकी गोलंदाजीच्या पर्यायाची उणीव आहे, असेही त्याने म्हटले होते; परंतु क्लार्क तसा विचार करीत नाही.क्लार्क म्हणाला, ‘‘मला वाटत नाही, की श्रीलंकेविरुद्ध आमच्या गत सामन्यात चेंडू जास्त स्पिन झाला. हे सर्व काही खेळपट्टी कशी तयार केली आहे, यावर अवलंबून आहे. खेळपट्टीवर गवत असल्यास निश्चितच आमच्या गोलंदाजांना साह्यकारक ठरेल. जर चेंडू स्पिन झाला तर आमच्या संघातही स्पिनसाठी पर्याय उपलब्ध आहेत. निवड समिती एससीजीवर पोहोचल्यानंतर त्याचे आकलन करून सर्वोत्तम संघ निवडतील, अशी आपल्याला आशा आहे.’’ (वृत्तसंस्था)
भारताविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार : क्लार्क
By admin | Published: March 22, 2015 1:14 AM