ऑनलाइन लोकमत
मेलबोर्न, दि. २९ - न्यूझीलंडने दिलेले १८४ धावांचे माफक आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने ३० षटकांत १५७ धावा केल्या आहेत. वन डे कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणा-या मायकल क्लार्कने सामन्यात अर्धशतक ठोकून संघाला विजयाच्या दिशेने नेले आहे.
वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड हे संघ आमने सामने असून न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १८४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अॅरोन फिंचला शून्यावर बाद करण्यात ट्रेंट बोल्टला यश आले. ऑस्ट्रेलियाची १ बाद २ धावा अशी होती. यानंतर डेव्हिड वॉर्नरने झंझावाती ४५ धावांची खेळी करुन संघाला मजबूत स्थितीत आणले. वॉर्नर बाद झाल्यावर स्टिव्हन स्मिथ व कर्णधार मायकेल क्लार्कने ऑस्ट्रेलियाला विजयाच्या समीप नेले आहे.
न्यूझीलंडला धडाकेबाज सुरुवात करुन देणारा कर्णधार ब्रँडन मॅक्यूलम पहिल्याच षटकांत शून्यावर बाद झाला. मिशेल स्टार्कचा भेदक मा-याने मॅक्यूलमने त्रिफळाचीत केले. यानंतर ग्लेन मॅक्सवेलच्या फिरकीने मार्टिन गुप्टिलला १५ धावांवर बाद केले. गुप्टिल वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला असून त्याने ९ सामन्यांमध्ये ५४७ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतकं व एका अर्धशतकाचा समावेश आहे. मिशेल जॉन्सनच्या गोलंदाजीवर केन विल्यम्सन १२ धावांवर झेलबाद झाला. यामुळे न्यूजीलंडची स्थिती १२.२ षटकांत ३ बाद ३९ अशी झाली. यानंतर रॉस टेलर व ग्रँट इलियट या जोडीने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत किवींचा डाव सावरला. या जोडीने न्यूझीलंडला ३५ षटकांत १५० धावा करुन दिल्या. मात्र पॉवर प्लेच्या पहिल्याच चेंडूवर रॉस टेलर ४० धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ कोरी अँडरसन व ल्यूक रॉंचीही शून्यावरच तंबूत परतले. डॅनियल व्हिटोरीने इलियटला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र ९ धावांवर असताना व्हिटोरीही बाद झाल व न्यूझीलंडची स्थिती ७ बाद १६७ अशी झाली. ग्रँट इलियट ८३ धावांवर असताना विकेट किपरकडे सोपा झेल देत माघारी परतला. यानंतर मेट हेन्री शून्यावर बाद झाला. टीम साऊदी मॅक्सेवलच्या चपळ क्षेत्ररक्षणाने ११ धावांवर बाद झाला व न्यूझीलंडचा डाव १८३ धावांवर आटोपला.
ऑस्ट्रेलियातर्फे मिशेल जॉन्सन व जेम्स फॉल्कनर यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. मिशेल स्टार्कने दोन तर ग्लेन मॅक्सवेलने एक विकेट घेतली. न्यूझीलंडचे चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.