माँटे कार्लो : जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू आणि क्ले कोर्टचा बादशाह राफेल नदाल याने तुफानी खेळ करताना माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विक्रमी ११व्यांदा जेतेपद पटकावले. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात नदालने जपानच्या केई निशिकोरीचा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवला.अंतिम सामन्यात चुरशीचा सामना होईल अशी अपेक्षा टेनिसप्रेमींना होती. मात्र नदालच्या धडाकेबाज खेळापुढे निशिकोरीचा काहीच निभाव लागला नाही. नदालने सुरुवातीपासून राखलेला आक्रमक पवित्रा अखेरपर्यंत कायम राखत निशिकोरीचा ६-३, ६-२ असा फडशा पाडला. याआधी उपांत्य सामन्यातही नदालने एकतर्फी विजय मिळवताना ग्रिगोर दिमित्रोवचा ६-४, ६-१ असा धुव्वा उडवला होता. त्याचवेळी, निशिकोरीने अॅलेक्झांडर झ्वेरेवविरुद्ध ३-६, ६-३, ६-४ असा झुंजार विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. माझ्या सामन्याचा निकाल शानदार ठरला, पण हा सामना सामान्य नक्कीच नव्हता. निशिकोरी जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. विशेष करून तो क्ले कोर्टवर खूप चांगला खेळतो. सध्या मी या क्षणांचा आनंद घेणार असून, त्यानंतर पुढच्या स्पर्धेचा विचार करेन. - राफेल नदालनदालचा विश्वविक्रमनदालने या शानदार जेतेपदासह कोणत्याही एका स्पर्धेत सर्वाधिक जेतेपद पटकावण्याचा विश्वविक्रम नोंदवला. एकाच स्पर्धेत ११ जेतेपद पटकावणारा नदाल पहिला खेळाडू ठरला.याआधी त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेचे विक्रमी दहावेळा जेतेपद उंचावले आहे. यासह नदालने जागतिक क्रमवारीतील आपले अव्वल स्थानही कायम राखले. नदालचे हे ७६वे एटीपी टूर जेतेपद असून, ३१वे मास्टर्स जेतेपद आहे.यासह त्याने सर्बियाचा स्टार नोव्हाक जोकोविचच्या ३१ मास्टर्स जेतेपदांच्या विक्रमाचीही बरोबरी केली. नदाल आता पुढील आठवड्यात रंगणाऱ्या बार्सिलोना स्पर्धेसाठी सज्ज होईल.
क्ले कोर्ट बादशाह ‘राफा’चे विक्रमी जेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:10 AM