विशांत वझे : अबुधाबी येथे झालेल्या विशेष आॅलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारा हर्षद दीपक गावकर सध्या बराच चर्चेत आहे. हर्षदने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे सुवर्ण मिळवले. वीजकेंद्रात सफाई कामगार असलेल्या हर्षदच्या आईच्या आनंदाला आता पारावार उरला नाही. कारणही तसेच आहे. डिचोली येथील केशव सेवा साधना संचालित नारायण झांट्ये विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थी असलेला हर्षद दीपक गावकर (वायंगिणी-मये) या १६ वर्षीय विशेष मुलाने ‘रोलर स्केटिंग’ स्पर्धेत ५०० व ३०० मीटरमध्ये सुवर्णपदके पटकाविली. त्याची ही कामगिरी राज्यासाठी अभिमानास्पद ठरली. संपूर्ण देशातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हर्षदची आई डिचोली वीज केंद्रात सफाई कामगार आहे. पतीच्या निधनानंतर हर्षदला सांभाळण्याची जबाबदारी त्याच्या आईवर येऊ न ठेपली. तिने आपल्या परिने कोणतीही कमतरता पडू दिली नाही. कबाडकष्ट केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राधिका यांनी हर्षल आणि त्याची बहीण तनिषा यांचे पालनपोषण केले. आज तिच्या मेहनतीचे चीज झाले. आता तिला मुलाच्या यशामुळे जगण्याची उमेद निर्माण झाली आहे. जागतिक पातळीवर मुलाने मोठी कामगिरी केली याची माहिती तिला दिली गेली तेव्हा तिचा विश्वासच बसत नव्हता. आता तिला आपल्या मुलाचा अभिमान वाटतोय. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
शाळेचे अध्यक्ष सागर शेट्ये यांनी हर्षदचे तसेच प्रशिक्षक प्रेमानंद नाईक यांचे अभिनंदन केले. मुख्याध्यापिका सीमा देसाई यांनी हर्षदच्या यशाबद्दल अभिमान असल्याचे सांगितले. प्रशिक्षक प्रेमानंद नाईक यांच्याकडून हर्षदने २०१४ पासून प्रशिक्षण सुरू केले होते. त्यानंतर त्याने राष्ट्रीय पातळीवरही चमक दाखविली होती. हा मुलगा जागतिक भरारी घेण्यास सक्षम आहे, याची खात्री होती असे प्रशिक्षक प्रेमानंद नाईक यांनी सांगितले. दरम्यान, विशेष आॅलिम्पिक स्पर्धेत गोव्याचे नाव उज्ज्वल करणाºया अशा विशेष मुलांच्या कामगिरीची दखल राज्याने घ्यावी. नवनियुक्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या मुलांसाठी आर्थिक मदत जाहीर करायला हवी, अशी मागणी केली जात आहे.