हरारे : ‘यॉर्कर मॅन’ जसप्रीत बुमराहच्या (२२ धावांत ४ बळी) भेदक माऱ्यानंतर लोकेश राहुल (नाबाद ६३ धावा) आणि पदार्पण करणारा विदर्भाचा फलंदाज फैज फझल (नाबाद ५५ धावा) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर धोनीच्या नेतृत्वाखालील युवा ब्रिगेडने झिम्बाब्वेला बुधवारी तिसऱ्या आणि अखेरच्या वन डेत दहा गड्यांनी सहज पराभूत करीत मालिका ३-० ने जिंकली. हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत यजमान संघाला ४२.२ षटकांत अवघ्या १२३ धावांत रोखले. नंतर सहज लक्ष्य २१.५ षटकांत बिनबाद १२६ धावा करीत गाठले. भारतीय संघाने पहिली वन डे नऊ आणि दुसरी वन डे आठ गडी राखून जिंकली होती. तीन सामन्यांच्या या दौऱ्यात भारतीय युवा खेळाडूंनी धम्माल केली. तिन्ही सामने जिंकून मालिकेत हॅट्ट्रिक साधली. याआधी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संंघाने २०१५ मध्ये झिम्बाब्वेवर ३-० ने आणि २०१३ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने झिम्बाब्वेवर ५-० ने विजय साजरा केला होता. करुण नायरला विश्रांती देत फैज फझल याला पदार्पणाची संधी देण्यात आली. फैजने संधीचा लाभ घेत अर्धशतकी खेळी केली. लोकेश राहुलने मालिकेत दुसऱ्यांदा चमक दाखविली. त्याने पहिल्या वन डेत पदार्पणात शतक ठोकण्याचा विक्रम नोंदविला होता. आज दोन्ही फलंदाजांनी शानदार सलामी देत २१.५ षटकांतच विजयावर शिक्कामोर्तब केले. राहुलने ७० चेंडंूत चार चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ६३ धावा आणि फैजने ६१ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५५ धावा ठोकल्या. विजयी चौकार फैजने मारला.झिम्बाब्वेने मालिकेतील तीन सामन्यांत ३० गड्यांच्या मोबदल्यात ४१७ धावा उभारल्या. भारताने तिन्ही सामन्यांत केवळ तीन गडी गमवित ४२८ धावा ठोकल्या. नाणेफेकीचा कौल झिम्बाब्वेच्या बाजूने गेल्याने त्यांनी आधी फलंदाजीचा निर्णय घेतला. वूसी सिबांडा याच्या सर्वाधिक ३८ धावांचा अपवाद वगळता अन्य खेळाडूंनी खेळपट्टीवर स्थिरावण्याचेही धैर्य दाखविले नाही. चामू चिभाभा २७, मारूमा १७ व नेव्हिल मार्देजिवा याने दहा धावा केल्या. अखेरचे सात फलंदाज १९ धावांत बाद झाले. झिम्बाब्वेचा चौथा गडी १०४ धावांत बाद झाल्यानंतर, याच धावसंख्येवर आणखी चार फलंदाज बाद झाले. डोनाल्ड तिरिपानो धावबाद होताच यजमानांचा डाव संपुष्टात आला.बुमराहने मालिकेत दुसऱ्यांदा चार गडी बाद केले. पहिल्या सामन्यात त्याने २८ धावा देत चार गडी बाद केले होते. धवल कुलकर्णी, यजुवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. (वृत्तसंस्था)धावफलकझिम्बाब्वे : हॅमिल्टन मस्कद्जा झे. राहुल गो. कुलकर्णी ८, चामू चिभाभा झे. बुमराह गो. चहल २७, वूसी सिबांडा झे. आणि गो. चहल ३८, मरुमा त्रि. गो. बुमराह १७, माल्कम वॉलर धावबाद ८, एल्टन चिगुंबुरा झे. धोनी गो. बुमराह ००, रिचमन्ड मुटुम्बामी झे. राहुल गो. बुमराह ४, ग्रीम केमर पायचीत गो. पटेल ००, नेव्हिल नाबाद १०, तवांदा मुपारिवा झे. पांडे गो. बुमराह ०१, डोनाल्ड तिरिपानो धावबाद २, अवांतर ८, एकूण ४२.२ षटकांत सर्व बाद १२३ धावा. गडी बाद क्रम : १/१९, २/५५, ३/८९, ४/१०४, ५/१०४, ६/१०४, ७/१०४. ८/१०८, ९/११०, १०/१२३. गोलंदाजी : शरण ८-०-४०-०, कुलकर्णी ६.२-१-१७-१, बुमराह १०-१-२२-४, पटेल १०-२-१६-१, चहल ८-०-२५-२.भारत : लोकेश राहुल नाबाद ६३, फैज फझल नाबाद ५५, अवांतर ८, एकूण २१.५ षटकांत बिनबाद १२६ धावा. गोलंदाजी तिरिपानो ५-१-१५-०, मद्जीवा ५-०-२५-०, मुपारिवा ६-०-४३-०, क्रेमर ४-०-२६-०, चिभाभा १.५-०-१५-०.महेंद्रसिंह धोनीचे यष्टीमागे ३५० बळीहरारे : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने यष्टीमागे ३५० बळी घेण्याची कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय यष्टिरक्षक बनला. ३४ वर्षांच्या धोनीने झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या वन डेत बुधवारी एल्टन चिगुंबुरा याला बाद करीत हा विक्रम केला. धोनीने २७८ सामन्यांत २६१ झेल घेतले असून, ८९ वेळा स्टम्पिंग केले. क्रिकेटविश्वात अशी कामगिरी करणाऱ्या यष्टिरक्षकांच्या यादीत धोनी चौथ्या स्थानावर आहे. कुमार संगकारा ४८२, अॅडम गिलख्रिस्ट ४७२, द. आफ्रिकेचा मार्क बाऊचर ४२४ यांच्या पाठोपाठ धोनीचा क्रम लागतो.युवा खेळाडूंना लाभयुवा खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर शानदार कामगिरी केली. कुणी म्हणेल, की अपेक्षाकृत कमकुवत संघावर विजय मिळविला, तर यात तथ्य नाही. मैदानावर कुणी कमकुवत नसतो. आमच्या युवा खेळाडूंमुळेच ‘क्लीन स्वीप’ शक्य झाले.- महेंद्रसिंह धोनी, कर्णधारदिशाहीन खेळलो संपूर्ण मालिकेत आमची सुरुवात तर चांगली झाली; पण मधल्या फळीने दिशाहीन खेळ केल्याने मालिका गमावली. फलंदाज धावा घेण्यात अपयशी ठरल्याने दडपण वाढतच गेले. या पराभवाची भरपाई टी-२० मालिकेत काढण्याचा प्रयत्न करू.- ग्रीम क्रेमर, कर्णधार झिम्बाब्वे.लोकेश मालिकावीरतीन सामन्यांत १९६ धावा ठोकणारा सलामीवीर लोकेश राहुल मालिकावीर ठरला. त्याने पहिल्या सामन्यात शतक ठोकले, तर आज नाबाद ६३ धावा केल्या. आजच्या सामन्यातही त्याला ‘मॅन आॅफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
झिम्बाब्वेला ‘क्लीन स्वीप’
By admin | Published: June 16, 2016 3:58 AM