शिवाजी गोरे
रिओ दि जानेरो : रिओ आॅलिम्पिकच्या मिश्र दुहेरीतील पराभवानंतर सानिया मिर्झाने अशा प्रकारच्या पराभवातून सावरणे एक आव्हान असते; परंतु आम्ही येथे कास्यपदकासाठी होणा-या लढतीत जोरदार पुनरागमन करू, असा विश्वास व्यक्त केला आहे.
उपांत्य फेरीतील पराभवानंतर सानिया म्हणाली, ‘‘जितक्या लवकर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सावरण्याचा आम्हाला प्रयत्न करावा लागेल आणि थोडी झोप घ्यावी लागेल, तसेच थोडा आहार घेऊन उद्या पुनरागमन करावे लागेल. आमच्याजवळ अजूनही पदक जिंकण्याची संधी असल्यामुळे आम्ही नशीबवान आहोत. सामन्यात एकवेळ आमची लय बिघडली; परंतु आम्ही चांगले खेळलो.’’
रोहन बोपन्ना म्हणाला, ‘‘टेनिसमध्ये काहीही होऊ शकते; परंतु आम्ही पुनरागमन करणार आहोत. सानियाने संधीनुसार चांगला खेळ केला. कारण ती एक चॅम्पियन आहे. तिने पहिल्या सेटच्या तुलनेनंतर चांगले परतीचे फटके मारले. आम्ही या सामन्यात पुन्हा लय मिळवली; परंतु तोपर्यंत ही लढत सुपर टायब्रेकपर्यंत खेचली गेली. तसे पाहिले तर आम्ही चांगला खेळ केला; परंतु पराभवातून आम्हाला सावरावे लागेल. प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत आमच्याकडे जास्त वेळ आहे आणि ते अजूनही कोर्टवर खेळत आहेत.’’
बोपन्नाने व्हिनसला श्रेय देताना म्हटले की, ‘‘जेव्हा तिने दुसºया सेटमध्ये चौथ्या गेममध्ये सर्व्हिस भेदली त्यानंतर तिने आणखी चांगली सर्व्हिस करणे सुरू केले. सर्वात चांगली बाब आमच्याकडे कास्यपदक जिंकण्याची संधी आहे. प्रतिस्पर्धीही पराभूत झाले असल्यामुळे आम्हाला सकारात्मक दृष्टिकोन अवलंबून खेळावे लागणार आहे.’’