ब्युनास आयर्स : कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार आणि स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला रामराम केला होता, त्याने आपला निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती अर्जेंटिनाच्या राष्ट्रपती मॉरिसियो मॅक्री आणि माजी दिग्गज खेळाडू दिएगो मॅराडोना यांनी केली आहे. सोमवारी पहाटे चिली व अर्जेंटिना यांच्यात कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना झाला. त्यात पेनल्टी शूटआऊटवर चिलीने बाजी मारली. विशेष म्हणजे मेस्सी स्वत: पेनल्टीवर गोल करण्यात चुकला. पराभवाचे हे शल्य मनात ठेवून मेस्सीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून माघार घेतली होती. यामुळे फुटबॉलविश्वात खळबळ उडाली. २०१८ मध्ये रशियात होणाऱ्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या त्यांच्या तयारीला धक्का बसला आहे. त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, असा देशभरातून चाहत्यांनी सूर लावला आहे. राष्ट्रपती मॉरिसियो मॅक्री यांनीही त्याला संघात कायम राहण्याची विनंती केली आहे. मॅक्री यांच्या प्रवक्त्याने सांगितले, की राष्ट्रपतींनी मेस्सीशी फोनवरून बातचीत केली. अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या संघाचा आपणाला अभिमान वाटत असल्याचे राष्ट्रपतींनी मेस्सीला सांगितले. टीकाकारांकडे लक्ष न देता मेस्सीने या संघात राहावे, अशी विनंती त्यांनी मेस्सीला केली. मेस्सीचा प्रथम क्रमाकांचा टीकाकार समजला जाणाऱ्या अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यानेही आपला रोख बदलून त्याला निवृत्ती मागे घेण्यास सांगितले आहे. (वृत्तसंस्था)
कमबॅक मेस्सी...
By admin | Published: June 29, 2016 4:17 AM