ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती भारतीय बॉक्सर लवलिना बोरगोहेन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात मध्येच निघून गेली. ही कृती तिच्या अंगलट आली. ती तब्बल दोन तास वाहतूक कोंडीत अडकली होती. भारतीय पथक प्रमुख राजेश भंडारी हे मात्र लवलिनावर नाराज दिसले. गुरुवारी रात्री दोन तासांहून अधिक काळ उद्घाटन सोहळा चालला. लवलिना आणि पथकातील सहकारी मोहम्मद हुसामउद्दीन हे अलेक्झांडर स्टेडियममधून क्रीडाग्रामकडे निघून गेले. उद्घाटन सोहळा मध्येच का सोडून दिला, असे विचारताच लवलिना म्हणाली, ‘शनिवारी मला सामना खेळायचा आहे. त्यासाठी सराव करणे गरजेचे आहे. सोहळा सुरू असताना आम्ही परतण्याचा निर्णय घेतला. आम्ही टॅक्सीची मागणी केली; पण टॅक्सी उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले.’
समारंभ सुरू असल्याने या दोन्ही खेळाडूंना टॅक्सी मिळाली नाही. आयोजकांनी भारतीय पथकाला बसेसशिवाय तीन कार उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र टॅक्सीचे चालक उपलब्ध नव्हते. पथक प्रमुख आणि बॉक्सिंग महासंघाचे उपाध्यक्ष भंडारी हे लवलिनाच्या कृतीवर नाराज होते. ते म्हणाले, ‘हे दोन्ही खेळाडू येताना बसमधून आले होते. त्यांना लवकर परत जायचे होते तर त्यांनी संचलनात सहभागी व्हायला नको होते. अन्य भारतीय खेळाडू सरावामुळे येथे येऊ शकले नाहीत. याबाबत मी विचारणा करणार आहे.’ याआधी लवलिनाने आपला छळ सुरू असल्याचा आरोप केला होता. खासगी कोच संध्या गुरूंग यांना आधी रोखल्यामुळे वाद निर्माण झाला. नंतर संध्याला क्रीडाग्राममध्ये वास्तव्यास परवानगी देण्यात आली होती.