गोल्ड कोस्ट : भारताच्या बॅडमिंटनटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. शुक्रवारी आपल्या अखेरच्या साखळी लढतीत भारताने स्कॉटलंडचा 5-0 असा धुव्वा उडवला आहे.
पहिल्या लढतीत भारताच्या सायना नेहवालने महिला एकेरीमध्ये जुली मॅकफरसनवर 21-14, 21-12 असे सहज नमवले. त्यानंतर झालेल्या पुरुषांच्या एकेरीमध्ये किदम्बी श्रीकांतने कायरन मेरिलेसवर 21-18, 21-2 असा दणदणीत विजय मिळवला.
सायना आणि श्रीकांत यांच्या विजयानंतर भारताच्या सिक्की रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनी महिला दुहेरीमध्ये स्कॉटलंडच्या किर्स्टी गि्लमोर आणि इलेनोर ओडोनेल यांच्यावर 21-8, 21-12 अशी सहज मात केली. भारताने हा सामना जिंकत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली.
स्कॉटलंडविरुद्धच्या चौथ्या लढतीतही भारताने सहज विजय मिळवला. पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रानकीरेड्डी यांनी पॅट्रीक मॅचुक आणि अॅडम हॉल यांच्यावर 21-16, 21-16 अशी मात केली. त्यानंतर झालेल्या मिश्र दुहेरीमध्ये प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी आणि मार्टिन कॅम्पबेल आणि जुली मॅकफरसन यांच्यावर 21-17, 21-15 असा विजय मिळवला.