गोल्ड कोस्ट: राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिलांनी टेबल टेनिसमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय महिला संघाने बलाढ्य सिंगापूरला 3-1 असे नमवत टेबल टेनिसमध्ये पहिल्यावहिल्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. सिंगापूरचा संघ विजेतेपदासाठी फेव्हरिट मानला जात होता. मात्र भारतीय महिलांनी जबरदस्त कामगिरी करत सिंगापूरला जोरदार धक्का दिला.
सिंगापूरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मनिका बत्राने संघर्षपूर्ण विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या तिनवेई फेंगला 11-8, 8-11, 7-11, 11-9 आणि 11-7 असा पराभवाचा धक्का देत मनिकाने भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र दुसऱ्या सामन्यात सिंगापूरच्या मेनग्यू यूने भारताच्या मधुरिका पाटकरचा 13-11, 11-2, 11-6 असा सरळ गेम्समध्ये धुव्वा उडवला. त्यामुळे अंतिम फेरीत 1-1 अशी बरोबरी निर्माण झाली. यानंतर दुहेरीत मौमा दास आणि मधुरिका पाटकर यांनी यिहान झोऊ आणि मेनग्यू यू यांचा 11-7, 11-6, 8-11 आणि 11-7 असा पराभव करत भारताला पुन्हा एकदा आघाडी मिळवून दिली. यानंतर मनिका बत्राने तिच्या दुसऱ्या सामन्यात यिहान झोऊचा 11-7, 11-4 आणि 11-7 असा पराभव करत संघाला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले. त्यामुळे भारताची स्पर्धेतील सुवर्णपदकांची संख्या 7 वर जाऊन पोहोचली. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 12 पदकांची कमाई केली आहे.