गोल्ड कोस्ट - राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सर्वाधिक अपेक्षा असलेल्या नेमबाजीमध्ये भारताच्या पदकांचे खाते उघडले आहे. रविवारी सकाळी झालेल्या महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या अवघ्या 16 वर्षांच्या मनू भाकरने आपल्याच देशाची अनुभवी नेमबाज हीना सिद्धू हिला मात देत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तर हीनाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. या प्रकारात ऑस्ट्रेलियाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील भारताचे हे सहावे सुवर्णपदक आहे. नेमबाजीतील या दोन पदकांच्या जोरावर भारताची स्पर्धेतील पदकांची संख्या 9 वर पोहोचली आहे.
महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकासाठी भारताच्या मनू भाकर आणि हीना सिद्धू यांच्यातच चुरस दिसून आली. पात्रता फेरीमध्येही अनुक्रमे मनू भाकर आणि हीना सिद्धूच पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या. त्यानंतर अंतिम फेरीत 16 वर्षांच्या मनूने जबरदस्त कामगिरी करत हिना सिद्धूला मात दिली आणि 240.9 गुणांसह सुवर्णपदकावर कब्जा केला. तर 243 गुणांची कमाई करणाऱ्या हिनाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.