गोल्डकोस्ट - राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सचा बोलबाला कायम असून, रविवारी सकाळी महिला वेटलिफ्टिंगच्या 69 किलो गटात भारतच्या पूनम यादवने सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेतील आणि भारोत्तलनामधील भारताचे हे एकूण पाचवे सुवर्णपदक आहे. या पदकाबरोबरच भारताची राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकांची संख्या सातवर पोहोचली असून ही सातही पदके भारताने भारोत्तोलनामध्ये जिंकली आहेत.
महिलांच्या वेटलिफ्टिंगच्या 69 किलो वजनी गटात भारताच्या पूनम यादव हिने क्लीन अॅण्ड जर्कच्या तिसऱ्या प्रयत्नात 122 किलो वजन उचलले. त्याआधी दुसऱ्या प्रयत्नात 122 किलो वजन उचलण्यात तिला अपयश आले होते. पूनमने एकूण 222 किलो भार उचलला. या प्रकारात इंग्लंडच्या साराह डेव्हिसला रौप्य तर फिजीच्या अपोलोनिया वैवानी हिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
त्याआधी आर. व्यंकट राहुल याने ८५ किलो वजन गटात देदीप्यमान कामगिरी करीत राष्ट्रकुल स्पर्धेच्या भारोत्तोलन प्रकारात चौथे सुवर्ण जिंकण्याचा मान मिळविला. २१ वर्षांच्या राहुलने एकूण ३३८ किलो वजन (१५१, १८७) उचलून अव्वल स्थान पटकाविले. राहुलला समोआचा डॉन ओपेलोज याच्याकडून आव्हानाचा सामना करावा लागला. त्याने एकूण ३३१ किलो वजन उचलले. दोघांनीही क्लीन अॅन्ड जर्कच्या अखेरच्या प्रयत्नात १९१ किलो वजन उचलण्याचा पर्याय निवडला. पण दोघेही अपयशी ठरले. प्रतिस्पर्धी खेळाडू १८८ किलो वजन उचलताना दुसºयाच प्रयत्नात अपयशी ठरताच राहुलचे सुवर्ण निश्चित झाले. ओपेलोज अखेरच्या प्रयत्नात यशस्वी ठरला असता तर राहुलला रौप्यावर समाधान मानावे लागले असते. मागच्या वर्षी राष्ट्रकुल चॅम्पियनशिपदरम्यान राहुलने एकूण ३५१ किलो (१५६,१९५ किलो) वजन उचलले होते.