नवी दिल्ली -21 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार कामगिरी लगोपाठ सुरुच आहे. पीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांनी आपापल्या सेमीफायनलमध्ये विजय मिळवत बॅडमिंटनच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. आता या दोन्ही भारताच्या खेळाडू एकमेकांसमोर उभ्या ठाकल्याने सामन्याची उत्सुकता अधिक वाढली आहे. शिवाय भारताचं सुवर्ण आणि रौप्य पदक निश्चित झालं आहे.
याआधी लंडन ऑलंम्पिक 2012 मध्ये कास्य पदक जिंकणा-या सायना नेहवालने सेमीफायनलमध्ये स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरला 21-14, 18-21, 21-17 ने पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये सायनाने खेळात सहज आघाडी घेतली. मात्र, दुस-या सेटमध्ये स्कॉटीश खेळाडूने जोरदार पुनरागमन केलं आणि सेट 21-18 ने काबिज केला. तिसरा सेट सायनाने 21-17 ने काबिज केला.
या वर्गातील दुसरा सेमीफायनल सामना रिओ ऑलंम्पिक रौप्य पदक विजेती पीव्ही सिंधू आणि कॅनडाची मिशेले ली यांच्यात झाला. या सामन्या सिंधूने सहज विजय मिळवला. सिंधूने पहिला सेट 21-18 ने आपल्या नावावर केला. तर दुसरा सेटही सिंधूने एकतर्फी विजय मिळवला.
दरम्यान, आज 10व्या दिवशी भारतासाठी शनिवारची सकाळ भारताला सुवर्ण कमाई करून देणारी सकाळ ठरली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या आजच्या दिवसाच्या खेळाची सुरूवात झाल्यापासून भारताने एकुण चार सुवर्णपदकांवर नावं कोरलं आहे. पहिले बॉक्सिंगमध्ये मेरी कॉमने सुवर्णपदक पटकाविल्यानंतर आता नेमबाज संजीव राजपूत, बॉक्सिंगमध्ये गौरव सोळंकी आणि कुस्तीपटू सुमित मलिकने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तर नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्ण मिळवलं आहे.
भारतीय नेमबाज संजीव राजपूतने पुरूषांच्या 50 मीटर 3 रायफल पोजिशनमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. बॉक्सिंगप्रकारात गौरव सोळंकीने पुरूषांच्या 52 किलोवजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. उत्तर आयर्लंडचा ब्रेंडन इरविनचा पराभव करत गौरवने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. तर कुस्तीपटू सुमित मलिकने यशस्वी कामगिरी करत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. दरम्यान, भारताच्या खात्यात आता एकुण 22 सुवर्णपदकं जमा झाली आहेत.