गोल्ड कोस्ट: कुस्तीपटू सुशील कुमारनं राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ७४ किलो फ्रीस्टाईलमध्ये सुशील कुमारनं सुवर्णपदक जिंकलं आहे. सुशील कुमारनं अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्नेस बोथाचा १०-० असा धुव्वा उडवला आहे. सुशीलनं मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे भारताच्या खात्यातील सुवर्णपदकांची संख्या १४ वर पोहोचली आहे.
प्रतिस्पर्धी खेळाडू जोहान्नेस बोथाला पूर्णपणे नामोहरम करत सुशील कुमारनं दणदणीत विजय मिळवला. या विजयासह सुशीलनं ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. राष्ट्रकुल स्पर्धेत तीन सुवर्णपदकांची कमाई करणारा खेळाडू होण्याचा मान सुशीलनं पटकावला आहे. याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूला अशी कामगिरी करता आली नव्हती. सुशीलचा यंदाच्या स्पर्धेतील धडाका इतका जबरदस्त होता की, संपूर्ण स्पर्धेत त्याच्या एकाही प्रतिस्पर्ध्याला एकाही गुणाची कमाई करता आली नाही. अंतिम फेरीतदेखील सुशीलनं आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्याला कोणतीही संधी दिली नाही. तांत्रिक कौशल्याच्या जोरावर त्याने अवघ्या ८० सेकंदांमध्ये जोहान्नेस बोथाचा पराभव केला.
सुशील कुमारनं २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ६६ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली होती. यानंतर त्यानं २०१४ मध्ये ७४ किलो गटात सुवर्णपदक जिंकलं होतं. आता यंदाच्या स्पर्धेत पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकावत सुशील सुवर्णपदकांची हॅट्रिक केली आहे. या स्पर्धेत सुशीलनं कॅनडाच्या जेवोन बॅलफोरचा ११-०, तर पाकिस्तानच्या मोहम्मद असाद बटचा १०-० असा धुव्वा उडवला. उपांत्य फेरीतही सुशीलनं अवघ्या दोन मिनिटांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या कोनोर इवान्सचा धूळ चारली होती.