गोल्डकोस्ट: नेमबाज तेजस्विनी सावंतनं अचूक निशाणा साधत भारताला स्पर्धेतलं पंधरावं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. तेजस्विनीनं तिच्या अनुभवाच्या जोरावर ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स प्रकारात अव्वल स्थान पटकावलं. तेजस्विनीनं काल ५० मीटर रायफल प्रकारात ६१८.९ गुणांची कमाई करत रौप्यपदक पटकावलं होतं. काल थोडक्यात हुकलेल्या सुवर्णपदकाला तेजस्विनीनं आज गवसणी घातली. तेजस्विनीनं भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं असताना अंजुम मुदगिलनं भारतासाठी रौप्यपदक जिकलं. अंजुम आणि तेजस्विनीमध्ये सुवर्णपदकासाठी अटीतटीचा सामना झाला. दोन भारतीय नेमबाज सुवर्णपदकासाठी लढत असल्याचा 'सोनेरी' क्षण 'गोल्डकोस्ट'मध्ये पाहायला मिळाला. अखेर यामध्ये तेजस्विनीनं बाजी मारली.
तेजस्विनीनं अचूक निशाणा साधत या स्पर्धेतील तिचं दुसरं पटकावलं. तिनं ४५७.९ गुणांची कमाई करत राष्ट्रकुल स्पर्धेत विक्रमाची नोंद केली. ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स प्रकारात भारताची अंजुम मुदगिलनं दुसरा क्रमांक मिळवत रौप्यपदक जिंकलं. तिनं एकूण ४५५.७ गुण मिळवले. दोन भारतीय नेमबाजांपुढे इतर देशांच्या खेळाडूंचा फारसा निभाव लागला नाही. स्कॉटलंडची सेओनेड मकिनटोश तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. तिला ४४४.६ गुणांची कमाई करता आली. तेजस्विनी आणि अंजुमनं या स्पर्धा प्रकारात संपूर्ण वर्चस्व राखल्याचं यावेळी पाहायला मिळालं. काल रौप्यपदक पटकावणाऱ्या तेजस्विनीनं आज सुवर्णपदकाला गवसणी घालत राष्ट्रकुल स्पर्धांमधील तिच्या पदकांची संख्या सातवर नेली. सध्या सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्विनीनं आतापर्यंत दोन पटकांची कमाई केली आहे. तर याआधी २००६ साली मेलबर्नमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्विनीनं १० मीटर एअर रायफल आणि १० मीटर एअर रायफल (पेअर्स) प्रकारात सुवर्ण पदकांची कमाई केली होती. याशिवाय २०१० साली नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्विनीनं ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्य, तर ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स आणि ५० मीटर रायफल प्रोन (पेअर्स) प्रकारात कांस्यपदक विजेती कामगिरी केली होती.