गोल्ड कोस्ट: भारताच्या तेजस्विनी सावंतनं राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. तेजस्विनी सावंतनं ५० मीटर रायफल प्रकारात ६१८.९ गुणांची कमाई करत रौप्यपदक पटकावलं आहे. तेजस्विनीचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलं. सिंगापूरच्या मार्टिना लिंडसे वेलोसोनं ६२१ गुण मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
आज तेजस्विनी सावंतनं तिचं राष्ट्रकुल स्पर्धेतलं सहावं पदक पटकावलं. याआधी २००६ साली मेलबर्नमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्विनीनं १० मीटर एअर रायफल आणि १० मीटर एअर रायफल (पेअर्स) प्रकारात सुवर्ण पदकांची कमाई केली होती. याशिवाय २०१० साली नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्विनीनं ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्य, तर ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स आणि ५० मीटर रायफल प्रोन (पेअर्स) प्रकारात कांस्यपदक विजेती कामगिरी केली होती. तेजस्विनी सावंतनं गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. तेजस्विनीनं एकाच प्रकारात दोनदा पदक जिंकलं आहे. याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही. तेजस्विनीनं २०१० मध्ये म्युनिचमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ५० मीटर रायफल प्रोनमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. या स्पर्धेत तेजस्विनीनं जागतिक विक्रमाची बरोबरी केली होती.