गोल्ड कोस्ट: राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीपटू राहुल आवारेनं अंतिम फेरीत धडक मारत भारताचं आणखी एक पदक निश्चित केलं आहे. राहुलनं ५७ किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मोहम्मद बिलालचा १२-८ नं पराभव करत उपांत्य फेरीचा सामना जिंकला आहे. आता अंतिम फेरीत राहुलला कॅनडाच्या स्टिफन ताकाहशीचा सामना करावा लागेल.
उपांत्यपूर्व फेरीत तांत्रिक सक्षमतेच्या जोरावर ११-० असा विजय मिळवणाऱ्या राहुल आवारेनं उपांत्य फेरीत सुरुवातीला सावध खेळ केला. राहुलनं बचावात्मक खेळ करत मोहम्मद बिलालला गुण मिळू दिला नाही. यानंतर राहुलनं तांत्रिक गुणांची कमाई करत आघाडी घेतली. मात्र राहुलची आघाडी मोहम्मदनं कमी केली. पहिल्या फेरीनंतर राहुलकडे ३-२ अशी आघाडी होती. दुसऱ्या फेरीला सुरुवात होताच राहुलनं पुन्हा एकदा बचावात्मक पवित्रा घेतला. या फेरीतही राहुलनं तांत्रिक गुण मिळवत आघाडी कायम ठेवली. मात्र मोहम्मदनं पुनरागमन करत सामना ४-४ असा बरोबरीत आणला. राहुल आणि मोहम्मदमध्ये अटीतटीची झुंज सुरु होती. यानंतर मोहम्मदनं आघाडी घेण्याच्या प्रयत्नात राहुलला खाली पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुलनं मोहम्मदचा डाव त्याच्यावरच उलटवला. राहुलनं प्रथम प्रतिस्पर्ध्याचा प्रयत्न निष्फळ केला. त्यानंतर त्यानं दोनदा मोहम्मदला लोळवलं आणि सहा गुणांची कमाई केली. यामुळे राहुलला १०-४ अशी भक्कम आघाडी मिळाली. यानंतर मोहम्मदनं २ गुण मिळवत पिछाडी भरुन काढण्याचा प्रयत्न केला. मोठी आघाडी घेतल्यानंतर राहुलनं सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवलं. सामना संपण्यास काही सेकंद बाकी असताना राहुलनं आणखी दोन गुणांची कमाई करत आघाडी १२-६ अशी केली. यानंतर मोहम्मदनं २ गुण मिळवले. मात्र तोपर्यंत सामना त्याच्या हातून निसटला होता. राहुलनं मोहम्मद बिलालचा १२-८ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केल्यानं भारताचं आणखी एक पद निश्चित झालं आहे.