Commonwealth Games 2022 Boxing : नितूनंतर भारताने बॉक्सिंगमध्ये आणखी एक सुवर्णपदक निश्चित केले. आशियाई पदक विजेत्या अमित पांघलने ( Amit Panghal) टोक्योतील निराशाजनक कामगिरी मागे टाकून आज कमाल केली. ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात अमितने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना इंग्लंडच्या किएरन मॅकडोनाल्डला हतबल केले. पहिला राऊंड अमितने सहज जिंकला, परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये मॅकडोनाल्डने संघर्ष दाखवला. तिसऱ्या राऊंडमध्ये सुरुवातीला डिफेन्सिव्ह खेळ केल्यानंतर अमितने अचानक अखेरच्या ४० सेकंदात जोरदार ठोसे मारले. अमितने ५-० अशा फरकाने सुवर्ण निश्चित केले.
अमित पांघल हे नाव देशातील सर्वोत्तम बॉक्सिंगपटूंपैकी एक आहे. २०१७मध्ये त्याने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि तो घराघरात पोहोचला. त्याच वर्षी त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याचा करिष्मा केला. २०१८ हे वर्ष त्याच्या आयुष्यात सुवर्णकाळ घेऊन आले. इंडियन ओपन आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे सुवर्णपदक त्याने जिंकले. २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले, त्यापाठोपाठ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून त्याने इतिहास घडविला. २०१९ च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचे सुवर्ण, २०१७ मध्ये कांस्य व २०२१मध्ये रौप्यपदक त्याने जिंकले. २०१९च्या जागतिक स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले आहे. हरयाणाच्या रोहतक जिल्ह्यातील मायना गावातला त्याचा जन्म... त्याचे वडील विजेंदर सिंग हे शेतकरी आहेत आणि भाऊ अजय हा भारतीय सैन्यात कार्यरत आहे. अजय हाही बॉक्सर होता.
#Boxingबॉक्सिंगमध्ये आजच्या दिवसाचे पहिले सुवर्णपदक आले. भारताच्या नितूने ४८ किलो वजनी गटात इंग्लंडच्या डेमी जेड रेसझ्तानवर ५-० असा विजय मिळवून गोल्ड मेडल जिंकले.
#Hockey भारतीय महिला हॉकी संघाने राष्ट्रकुल क्रीड स्पर्धेत न्यूझीलंडवर पेनल्टी शूट आऊटमध्ये विजय मिळवून कांस्यपदक जिंकले. निर्धारीत वेळेत शेवटच्या १८ सेकंदात भारताने न्यूझीलंडला पेनल्टी स्ट्रोक दिल्याने १-१ अशी बरोबरी झाली. पण, पेनल्टी शूटआऊटमध्ये सविताने अप्रतिम बचाव केला.
#Badminton भारताच्या पी व्ही सिंधूने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चत केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात तिने सिंगापूरच्या जिआ मिन येओवर २१-१९, २१-१७ असा पराभव केला. सिंधूला २०१९च्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला एकेरीच्या रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते, परंतु यंदा त्याचे रुपांतर सुवर्णपदकात करण्याचा तिचा निर्धार आहे. २०१८मध्ये सिंधूने मिश्र सांघिक गटाचे सुवर्णपदक जिंकले होते, तर २०२२मध्ये याच गटात रौप्यपदकही नावावर आहे. २०१४ मध्ये महिला एकेरीत कांस्यपदकाची तिने कमाई केली होती.