Commonwealth Games 2022 Women's Javelin Throw : नितू व अमित पांघल या बॉक्सर्सनी रविवारी भारताला दोन सुवर्णपदक जिंकून दिले. महिला हॉकी संघानेही इतिहास घडविताना कांस्यपदकाची कमाई केली. त्यापाठोपाठ अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या तिहेरी उडीत एलडोस पॉल व अब्दुल्ला अबूबाकेर यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक निश्चित केले. पुरुषांच्या १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमारने ( Sandeep Kumar) सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद करून कांस्यपदक जिंकले. त्यात आणखी एका पदकाची भर पडली.
#Women's Javelin Throw महिलांच्या भालाफेकीत उत्तरप्रदेशच्या अन्नू राणीने कांस्यपदकाची कमाई केली. तिने चौथ्या प्रयत्नात ६० मीटर फेकलेला भाला हा पदकासाठी पुरेसा ठरला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या ( २०१९ दोहा) अंतिम फेरीत पात्र ठरणारी ती भारताची पहिली महिला भालाफेकपटू ठरली होती. ६३..२४ मीटर ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे. तिच्या भावाने तिला या खेळात आणली.. सुरुवातीला ऊस फेकून तिने भालाफेकीचा सराव केला, भाला खरेदी करण्यासाठी तिच्याकडे पैसे नसल्याने बाम्बूच्या मदतीने ती सराव करायची. २०१४च्या आशियाई स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले, तर २०१७ व २०१९च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिच्या नावावर अनुक्रमे कांस्य व रौप्यपदक आहे.
#Triple Jump अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या तिहेरी उडीत एलडोस पॉल व अब्दुल्ला अबूबाकेर यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक निश्चित केले. पॉलने १७.०३ मीटर, तर अब्दुल्लाने १७.०२ मीटर लांब तिहेरी उडी मारली.
#Boxing अमित पांघलने ( Amit Panghal) टोक्योतील निराशाजनक कामगिरी मागे टाकून आज कमाल केली. ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात अमितने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना इंग्लंडच्या किएरन मॅकडोनाल्डला हतबल केले. पहिला राऊंड अमितने सहज जिंकला, परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये मॅकडोनाल्डने संघर्ष दाखवला. तिसऱ्या राऊंडमध्ये सुरुवातीला डिफेन्सिव्ह खेळ केल्यानंतर अमितने अचानक अखेरच्या ४० सेकंदात जोरदार ठोसे मारले. अमितने ५-० असा विजय मिळवून सुवर्णपदक पक्के केले.
#Boxing बॉक्सिंगमध्ये आजच्या दिवसाचे पहिले सुवर्णपदक आले. भारताच्या नितूने ४८ किलो वजनी गटात इंग्लंडच्या डेमी जेड रेसझ्तानवर ५-० असा विजय मिळवून गोल्ड मेडल जिंकले.
#Hockey भारतीय महिला हॉकी संघाने राष्ट्रकुल क्रीड स्पर्धेत न्यूझीलंडवर पेनल्टी शूट आऊटमध्ये विजय मिळवून कांस्यपदक जिंकले. निर्धारीत वेळेत शेवटच्या १८ सेकंदात भारताने न्यूझीलंडला पेनल्टी स्ट्रोक दिल्याने १-१ अशी बरोबरी झाली. पण, पेनल्टी शूटआऊटमध्ये सविताने अप्रतिम बचाव केला.