Commonwealth Games 2022 Avinash Sable : महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने केनियन खेळाडूंची मक्तेदारी मोडून काढताना ऐतिहासिक पदकाची कमाई केली. बीडच्या अविनशा साबळेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला ३००० मीटर स्टीपलचेस मध्ये रौप्यपदक जिंकून दिले. या क्रीडा प्रकारातील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. त्यानंतर काही तासांच्या आतच अविनाश ५००० मीटर शर्यतीत ट्रॅकवर उतरला, परंतु तो शर्यत पूर्ण करू शकला नाही.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मागील सहा पर्वांत केनियाच्या खेळाडूंनी तीनही पदकांवर आपले वर्चस्व प्रस्तापित केले होते, परंतु आज अविनाशने त्या वर्चस्वाला मोठा धक्का दिला. अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेस ( Avinash Sable broke the 3000m Steeplechase National Record ) शर्यतीच्या अंतिम फेरीत ८:११.२० सेकंदाच्या राष्ट्रीय विक्रमी वेळेसह रौप्यपदक जिंकले. केनियाचे तीन खेळाडू आघाडीवर असतानाही अविनाश त्यांना तोडीसतोड उत्तर देत होता. चौथ्या क्रमांकावर असलेल्या अविनाशने अखेरच्या राऊंडपर्यंत हे स्थान कायम राखले होते. अखेरच्या लॅपमध्ये अविनाशने मुसंडी मारली आणि रौप्यपदकाच्या शर्यतीत झेप घेतली. त्याची ही धाव पाहून स्टेडियमवर भारताचा जयघोष होऊ लागला. केनियाच्या खेळाडूंचीही धाकधुक वाढली होती आणि अविनाशने टफ फाईट दिली. ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली.