Commonwealth Games 2022 Badminton : बॉक्सिंग, अॅथलेटिक्स, हॉकी पाठोपाठ भारतीयांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पदक निश्चित केले आहे. भारताची आघाडीची बॅटमिंटनपटू पी व्ही सिंधू ( PV Sindhu) हिने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, तर लक्ष्य सेनने ( Lakshya Sen) पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत स्थान पटकावले. पुरुष एकेरीत जेतेपदाच्या लढतीत भारतीयांमध्ये चुरस पाहायला मिळाली असती, परंतु दुसऱ्या उपांत्य फेरीत श्रीकांत किदम्बीचा पराभव झाला.
#Badminton भारताच्या पी व्ही सिंधूने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चत केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात तिने सिंगापूरच्या जिआ मिन येओवर २१-१९, २१-१७ असा पराभव केला. सिंधूला २०१९च्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला एकेरीच्या रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते, परंतु यंदा त्याचे रुपांतर सुवर्णपदकात करण्याचा तिचा निर्धार आहे. २०१८मध्ये सिंधूने मिश्र सांघिक गटाचे सुवर्णपदक जिंकले होते, तर २०२२मध्ये याच गटात रौप्यपदकही नावावर आहे. २०१४ मध्ये महिला एकेरीत कांस्यपदकाची तिने कमाई केली होती.
#Badminton पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या लक्ष्य सेनने चुरशीच्या लढतीत सिंगापूरच्या जिआ हेंग तेहवर २१-१०, १८-२१, २१-१६ असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. पण, पुरुष एकेरीच्या दुसऱ्या लढतीत श्रीकांत किदम्बीला पराभव पत्कवाला लागला. मलेशियाच्या त्झे यंग एनजीने १३-२१, २१-१९, २१-१० असा विजय मिळवला. आता सुवर्णपदकाच्या सामन्यात लक्ष्य सेन विरुद्ध त्झे यंग एनजी असा सामना रंगणार आहे.