Commonwealth Games 2022 Badminton : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारताने टेबल टेनिसमधील पुरुष सांघिक गटाचे सुवर्णपदक कायम राखले, महिलांनी लॉन बॉल या खेळात भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावून दिले. वेटलिफ्टिंगमध्ये विकास ठाकूरने ९६ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकताना सलग तिसऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची कमाई केली. त्यामुळे आज मिश्र सांघिक गटातील बॅडमिंटनच्या अंतिम फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मलेशियाविरुद्ध पहिला सामना गमावल्यानंतर महिला एकेरीच्या दुसऱ्या लढतीत पी व्ही सिंधूने ( PV Sindhu) भारताला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली, परंतु किदम्बी श्रीकांतला शर्थीचे प्रयत्न करूनही आघाडी मिळवून देता आली नाही. त्यापाठोपाठ महिला दुहेरीतही हार झाल्याने भारताला १-३ अशा फरकाने पराभवासह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
मिश्र सांघिक गटातील पहिल्या पुरुष दुहेरी लढतीत सात्विक साईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी कडव्या संघर्षानंतरही मलेशियाच्या टेंग फाँग आरोन व वुई यिस सोह या जोडीकडून १८-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. मलेशियाने १-० अशी आघाडी घेतली. सात्विक व चिराग या जोडीला मलेशियन जोडीसमोर मागील पाच सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नव्हता. भारताला कमबॅक करून देण्याची जबाबदारी
ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूवर होती. तिच्यासमोर जिन वेई गोहचे आव्हान होते. दोघींमधील पहिला गेम कमालीचा चुरशीचा झाला. सिंधूला विजय मिळवणे वाटते तितके सोपे नक्की नाही, याचा अंदाज याच गेममध्ये आला. सिंधूने २२-२० असा विजय मिळवून आघाडी घेतली खरी, परंतु मलेशियन खेळाडू ऐकण्यातली नव्हती. दुसऱ्या गेममध्येही सुरुवातीला चुरस रंगली, परंतु सिंधूने आघाडी घेत हा गेम २१-१७ असा जिंकला अन् भारताने १-१ अशी बरोबरी मिळवली.
महिला दुहेरीत जॉली थ्रीसा व गायत्री गोपिचंद यांना पहिल्याच गेममध्ये १८-२१ अशा फरकाने कूंग ले पीर्ली व मुरलीधरन थिन्नाहकडून पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या गेममध्येही मलेशियाच्या जोडीने १३-८ अशी आघाडी घेत भारताच्या युवा खेळाडूंवर दडपण निर्माण केले. भारतीय खेळाडूंनी हा गेम १७-१९ असा अटीतटीचा केला. मलेशियन जोडीने १ गुण घेत मॅच पॉईंट मिळवला अन् २१-१७ असा विजय मिळवताना सुवर्णपदकावर नाव कोरले.