Commonwealth Games 2022 Boxing : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारतीय बॉक्सिंगपटूंनी तीन पदकं निश्चित केली आहे. सागर ( ९२+ किलो), जास्मिन ( ५७-६० किलो) व अमित पांघल ( ४८-५१ किलो) यांनी आपापल्या गटाची उपांत्य फेरी निश्चित करून किमान कांस्यपदक पक्के केले आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या लवलीना बोरगोहाईंचा पराभव हा धक्कादायक निकाल ठरला. आतापर्यंत भारताच्या सहा बॉक्सर्सनी पदक निश्चित केले आहे. काल नीतू, हुसैन मुहम्मद व निखत जहीरनने पदक पक्के केले होते.
#Boxing आशियाई पदक विजेत्या अमित पांघलने ४८-५१ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनचा ५-० असा सहज पराभव केला. उपांत्य फेरीत प्रवेश करून त्याने भारतासाठी यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील बॉक्सिंगमधील चौथे पदक पक्के केले.
#Badminton भारताच्या पी व्ही सिंधूने महिला एकेरीच्या राऊंड ऑफ ३२ मध्ये मालदिवच्या फातिमा नबाह अब्दुल रझ्झाकवर २१-४, २१ -११ असा विजय मिळवला. मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा/बी सुमिथ रेड्डी यांनी २१-१८, २१-१६ अशा फरकाने इंग्लंडच्या हेमिंग कॅलम/ पघ जेसिका यांचा पराभव केला. पुरुष एकेरीत श्रीकांत किदम्बीने २१-९, २१-९ असा सहज युगांडाच्या डॅनिएल वनगॅलियावर मात केली.
#Athletics महिलांच्या हातोडाफेक स्पर्धेत मंजू बालाने ५९.६८ मीटर हातोडा फेकून अंतिम फेरीत प्रवेश पक्का केला. ५७.४८ मीटर लांब हातोडा फेकणारी सरिता सिंग १३ वी आली आणि तिला अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही. हिमा दासने महिलांच्या २०० मीटर स्पर्धेत उपांत्यफेरी गाठली आहे. तिने २३.४२ सेंकदात हे अंतर गाठले. हिमा हिट-२ मध्ये अव्वल राहिली असून तिचा उपांत्यफेरीचा सामना अनुक्रमे ५ आणि ६ ऑगस्ट रोजी होईल.