Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत बुधवारी भारताच्या खात्यात तीन पदकांची भर पडली. वेटलिफ्टर लवप्रीत सिंग ( Lovepreet Singh) १०९ किलो वजनी गटात कांस्यपदक, स्क्वॉशपटू सौरव घोषालने पुरूष एकेरीत कांस्य आणि ज्युदोपटी तुलिका मानने विक्रमी रौप्यपदक जिंकले. स्क्वॉशमध्ये एकेरीत पदक जिंकणारा सौरव हा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. मध्यरात्री तेजस्वीन शंकरने ( Tejaswin Shankar) उंच उडीत कांस्यपदकाची कमाई केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेजस्वीनचा अगदी अखेरच्या क्षणाला भारताच्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या ताफ्यात समावेश करण्यात आला होता. उंच उडीतील भारताचे हे पहिलेवहिले पदक ठरले
न्यूझीलंडच्या हामिश केरने सुवर्ण, तर ऑस्ट्रेलियाच्या ब्रेंडन स्टार्कने रौप्यपदक जिंकले. ब्रेंडन स्टार्क हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मिचेल स्टार्क याचा भाऊ आणि महिला क्रिकेटपटू एलिसा हिली हिची दीर आहे. २०१८मध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
कोण आहे तेजस्वीन शंकर?दिल्लीतील तमिळ कुटुंबातील तेजस्वीनचा जन्म.. ८व्या इयत्तेपर्यंत तो क्रिकेट खेळायचा, परंतु शारीरिक शिक्षणाच्या सरांनी त्याला उंच उडी शिकण्याचा सल्ला दिला आणि त्याने आंतरशालेय अॅथलेटिक्स स्पर्धेत पदकही जिंकले. त्याचे वडील हरीशंकर हे वकील होते, परंतु २०१४ मध्ये रक्ताच्या कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले. २०१५च्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेत त्याने २.१४ मीटर उंच उडीसह सुवर्णपदक जिंकले. २०१६ मध्ये दक्षिण आशियाई स्पर्धेत २.१७ मीटरसह रौप्यपदकाची कमाई केली. दुखापतीमुळे त्याला आशियाई कनिष्ट अजिंक्यपद स्पर्धेत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि जागतिक स्पर्धेला मुकावे लागले होते. १७व्या वर्षी त्याने हरी शंकर रॉय यांचा १२ वर्ष जुना २.२५ मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडताना कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत २.२६ मीटरची नोंद केली. २०१८मध्ये त्याने इंडोअर राष्ट्रीय विक्रम मोडला आणि २.१८ मीटरची नोंद केली.