Commonwealth Games 2022 TableTennis Men's team final: भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मंगळवारी लॉन बॉल ( Lawn Bowls) स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. ९२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासातील भारताचे या क्रीडा प्रकारातील हे पहिलेच पदक ठरले. आतापर्यंत १२ खेळांमध्ये भारताने किमान एकतरी गोल्ड जिंकले आहे. नेमबाजीत सर्वाधिक ६३ सुवर्ण भारताच्या खात्यात आहेत. त्यापाठोपाठ वेटलिफ्टिंग ( ४६), कुस्ती ( ४३), बॉक्सिंग ( ८) , बॅडमिंटन ( ७), टेबल टेनिस ( ६), अॅथलेटिक्स ( ५) , तिरंदाजी ( ३) , हॉकी, टेनिस, स्क्वॉश व लॉन बॉल ( प्रत्येकी १) असा क्रम येतो. त्यात आज टेबल टेनिसमध्ये आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली. भारताच्या पुरुष संघाने जेतेपद कायम राखताना सिंगापूरवर ३-१ असा विजय मिळवला.
#TableTennis Men's team final टेबल टेनिसमध्ये पुरूष सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात भारताने पहिल्याच दुहेरीच्या लढतीत विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या हरमीत देसाई व साथियन ज्ञानसेकरन या जोडीने अटीतटीच्या सामन्यात सिंगापूरच्या याँग इझाक व येव एन कोएन पँग यांचा १३-११, ११-७, ११-५ असा पराभव केला.
पुरुष एकेरीत धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. जागतिक क्रमावारीत १३३व्या स्थानावर असलेल्या झे यू क्लेरेन्सने कडवी टक्कर देताना ३९व्या क्रमांकित अचंथा शरथ कमलचा ११-७, १२-१४, ११-३, ११-९ असा पराभव करून सिंगापूरला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. पण, दुसऱ्या पुरुष एकेरीच्या सामन्यात साथियनने बाजी पलटवली. त्याने सिंगापूरच्या येव एन कोएन पँगवर १२-१०, ७-११, ११-७, ११-४ असा विजय मिळवला. भारताने पुन्हा २-१ अशी आघाडी घेतली.
एकेरीच्या तिसऱ्या सामन्यात हरमीत देसाईने ११-८, ११-५ अशी आघाडी घेताना सिंगापूरच्या झे यू क्लेरेन्सचा बॅकफूटवर फेकले. त्यामुळे तिसरा गेम चुरशीचा रंगताना दिसला. हरमितने तिसरा गेम ११-६ असा जिंकून भारताच्या सुवर्णपदकावर नाव पक्के केले.