Commonwealth Games 2022 Hockey Final : भारतीय पुरुष हॉकी संघाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सहावेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाने भुईसपाट केले. पहिल्या ३० मिनिटांच्या खेळातच ऑसींनी ५ गोल करून भारताला पूर्णपणे बॅकफूटवर फेकून दिले होते. आता एखादा चमत्कारच भारताला सुवर्णपदक जिंकून देऊ शकत होता, कारण ऑस्ट्रेलियाने संपूर्ण सामन्यात वर्चस्व कायम राखले. ऑस्ट्रेलियाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाची परंपरा कायम राखताना सातव्यांदा जेतेपद नावावर केले. भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
महिला हॉकी संघाने १६ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकाची ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर सर्वांच्या नजरा भारतीय पुरुष हॉकी संघाच्या कामगिरीकडे होती. २०१० व २०१४ मध्ये रौप्यपदक विजेत्या भारतीय संघासमोर सुवर्णपदकाच्या लढतीत सहावेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा सामना करणे तितके सोपे नक्की नसेल याची जाण भारताला होती. पहिल्या दहा मिनिटांत कांगारूंनी तीन पेनल्टी कॉर्नर मिळवले, तिसऱ्या प्रयत्नात ब्लॅक गोव्हर्सने १-० अशी आघाडी मिळवली. ऑसींनी चेंडूवर ताबा राखून भारतावर दडपण निर्माण केले होते. १४व्या मिनिटाला नॅथन एफरौमसच्या मैदानी गोलने भारताला ०-२ असे पिछाडीवर टाकले.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या क्वार्टरमध्येही वर्चस्व गाजवताना आणखी दोन गोलची भर टाकली. पी आऱ श्रीजेश ऑस्ट्रेलियाचे पेनल्टी कॉर्नर रोखून खिंड लढवत होता, परंतु भारतीय संघाचा बचाव ऑसींनी खिळखिळीत केला होता. २२व्या मिनिटाला जेकब अँडरसनने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला, तर २६व्या मिनिटाला टॉम विकहॅमने मैदानी गोल करून ४-० अशी आघाडी भक्कम केली. भारतीय खेळाडूंना फार क्वचितच ऑसींच्या सर्कलमध्ये चेंडू घेऊन जाता आला होता. पुढच्याच मिनिटाला जेकब अँडरसनने मैदानी गोल करून ५-० अशी आघाडी मिळवली. आता चमत्कारच भारताला सुवर्णपदक जिंकून देऊ शकत होता. ४२व्या मिनिटाला नॅथन व ४६व्या मिनिटाला फिनने गोल करून ऑस्ट्रेलियाला ७-० अशी आघाडी मिळवून दिली.