Commonwealth Games 2022 Hockey : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी कुस्तीत तीन सुवर्णपदकं भारताने पटकावली. त्याशिवाय अॅथलेटिक्समध्ये दोन रौप्य, लॉन बॉलमध्ये रौप्य व कुस्तीतील दोन कांस्य अशी पदकं जिंकली. रवी दहिया, विनेश फोगाट व नवीन यांनी सुवर्णपदक जिंकले, तर पूजा सिहाग व पूजा गेहलोत यांनी कांस्यपदकाची कमाई केली. यानंतर सर्वांचे लक्ष लागले होते ते पुरुष हॉकी संघाच्या कामगिरीकडे. महिला संघाला शुक्रवारी चुकीच्या निर्णयामुळे उपांत्य फेरीत हार मानावी लागल्यानंतर पुरुषांकडून अंतिम फेरीची अपेक्षा होती. त्यावर भारतीय खेळाडू खरे उतरले. चुरशीच्या अंतिम सामन्यात भारताने ३-२ अशा फरकाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरूष संघाला २०१० व २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकता आले होते आणि आता त्यांना पहिले सुवर्णपदक जिंकण्याची संधी पुन्हा चालून आली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय खेळाडूंचा पहिल्या सत्रातील खेळा निराशाजनक राहिला. आफ्रिकेने जवळपास आघाडी घेतलीच होती, परंतु गोलरक्षक पी आर श्रीजेशने अप्रतिम बचाव केला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने गोलखाते उघडले. २०व्या मिनिटाला अभिषेकने मैदानी गोल करून १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर भारतीय खेळाडूंचे मनोबल उंचावले आणि त्यांच्याकडून सातत्याने आक्रमण होताना दिसले. २२व्या मिनिटाला ललित उपाध्यायकडून गोल करण्याची संधी हुकली. त्यानंतर आफ्रिकेच्या गोलरक्षकाने भारताचे सलग तीन पेनल्टी कॉर्नर रोखले. २८व्या मिनिटाला मनदीप सिंगने अप्रतिम मैदानी गोल करून भारताची आघाडी २-० अशी वाढवली.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने बचावात्मक खेळ केला. ३३व्या मिनिटाला आफ्रिकेच्या रियान जुलियसने १-२ अशी पिछाडी कमी केली. ४१व्या मिनिटाला जरमनप्रीत सिंगचा पेनल्टी कॉर्नर गोलरक्षकाने अडवला. अखेरच्या क्वार्टरमध्ये आफ्रिकेचा खेळ अधिक आक्रमक झाला. पण, भारताने बचावही तितकाच भक्कम ठेवला. ५९व्या मिनिटाला रेफरीने आफ्रिकेच्या गोलरक्षकालाच मैदानाबाहेर केले आणि त्याचवेळी मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गुजराज सिंगने गोल करून भारताची आघाडी ३-१ अशी भक्कम केले. पण, ५९व्या मिनिटाला मुस्तफा कॅमिएमने गोल करून सामन्यात चुरस निर्माण केली. पण, भारताने ३-२ असा विजय पक्का केला.