बर्मिंगहॅम : इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताने पदकाचे खाते उघडले आहे. शनिवारी मराठमोळ्या संकेत महादेव सरगरने रौप्य पदक जिंकून भारताला पहिले राष्ट्रकुल पदक मिळवून दिले. भारतीय खेळाडूंची उल्लेखणीय कामगिरी सुरूच आहे. भारतीय मिश्र बॅडमिंटन संघाने राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये शनिवारी श्रीलंकेवर मात करून मोठा विजय मिळवला आहे. या विजयासोबत भारताने सलग दुसरा सामना आपल्या नावावर केला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला ५-० ने चितपट केल्यानंतर आता श्रीलंकेला देखील क्विन स्विप देत भारताने आपला विजयरथ कायम ठेवला आहे.
दरम्यान, अश्विनी पोनप्पा आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी या मिश्र दुहेरीच्या जोडीने सचिन दियास आणि थिलिनी हेंडाहेवा या जोडीवर २१-१४, २१-९ असा विजय मिळवत भारताच्या खात्यात आणखी एका विजयाची भर घातली. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पदार्पण करत असलेल्या लक्ष्य सेनने करूणारत्नेचा २१-१८, २१-१५ ने पराभव केला. पहिल्या गेममध्ये लक्ष्यला पकड बनवण्यासाठी थोडा वेळ लागला मात्र दुसऱ्या गेममध्ये त्याने सहज विजय मिळवला. याशिवाय २० वर्षीय आकर्षी कश्यपने पदार्पण करताना विदारा विदनगेविरूद्धच्या एकतर्फी सामन्यात २१-३, २१-९ अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला.
त्रिशा शॉली आणि गायत्री जोडी चमकली
पुरूष दुहेरीच्या सामन्यात सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी २१-१०, २१-१३ विजय मिळवला. तर त्रिशा शॉली आणि गायत्री यांनी महिला दुहेरीच्या सामन्यात २१-१८, २१-६ अशा फरकाने विजय मिळवला.