Commonwealth Games 2022 Day 2 Live Mirabai Chanu Wins Gold : भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने आज भारताला सुवर्णपदकाची कमाई करून दिली. आजच्या दिवसातील हे भारताचे तिसरे वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील पदक ठरले. पुरुष वेटलिफ्टर संकेत सरगर आणि गुरूराजा पुजारी या दोघांनी भारताला अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई करून दिली होती. त्यानंतर महिलांच्या ४९ किलो वजनी गटात वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने देशाला सुवर्णकमाई करून दिली. मीराबाई चानूने एकूण २०१ किलोची (८८ + ११३) उचल करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिची ही उचल राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धांमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली.
--
--
मीराबाई चानू हिने ४९ किलो वजनी गटात पहिल्या प्रयत्नात ८४ किलो वजन उचलले. तिने पहिल्याच प्रयत्नात मोठी आघाडी घेतली आणि सुवर्णपदकासाठी दावा सांगितला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तिने ८८ किलो वजनाची उचल केली. या प्रयत्नासोबतच तिने स्वत:च्या वैयक्तिक रेकॉर्डची बरोबरी केली. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने सर्वोत्तम उचल केली. या आधी तिची स्नॅच प्रकारात सर्वोत्तम कामगिरी ८७ किलो होती. तिसऱ्या प्रयत्नात मिराबाई चानूने ९० किलो वजनाची उचल करायचे ठरवले. पण तिचा हा प्रयत्न फसला, तरीही आधीच्या दोन प्रयत्नांच्या जोरावर तिने १२ किलोंची आघाडी घेतली. मीराबाई चानू हिने ४९ किलो वजनी गटाच्या स्नॅचमध्ये ही उचल करत नॅशनल रेकॉर्ड तर केलेच पण त्यासोबत कॉमनवेल्थ गेम्समधील रेकॉर्डही तिने मोडले आणि नवा उच्चांक प्रस्थापित केला.
मीराबाई चानूची रेकॉर्ड-ब्रेकिंग उचल (स्नॅच)-
--
त्यानंतर मीराबाई चानूने क्लीन अँड जर्क प्रकारातही संपूर्ण वर्चस्व राखलं. मीराबाई चानूने धडाकेबाज कामगिरी करत ११३ किलो वजनाची उचल केली. तिच्या या प्रयत्नाला टक्कर देणं कोणालाच जमलं नाही. दुसऱ्या क्रमांकाची उचल करणाऱ्या खेळाडूची सर्वोत्तम कामगिरी ही ९७ किलो इतकी होती. त्यामुळे मीराबाईने दोन्ही गटात मोठी आघाडी घेत सुवर्णपदक मिळवले.