Commonwealth Games 2022 Judo Silver : राष्ट्रकुल स्पर्धेत बुधवारी भारताचा वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने ( Lovepreet Singh) १०९ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकून पदकसंख्या १४ वर नेली. बॉक्सिंगमध्ये नितू पांघास व मोहम्मद हुस्सामुद्दीन यांनी आपापल्या गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून भारतासाठी दोन पदकं पक्की केली. महिलांच्या ९७ किलो वजनी गटात पूर्णिमा यादवला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताच्या महिला हॉकी संघाने कॅनडावर ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुष हॉकी संघाने ८-० अशा फरकाने कॅनडाचा धुव्वा उडवताना उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.
भारताची ज्युदोपटू तुलिका मान हिने ज्युदोत भारताचे आणखी एक पदक निश्चित केले होते. तिने महिलांच्या ७८+ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करताना न्यूझीलंडच्या सिडनी अँड्य्रूवर विजय मिळवला होता. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुशीला देवीने भारताला ज्युदोत पहिले पदक जिंकून दिले. सुशीलाच्या रौप्यपदकानंतर विजय कुमारने कांस्यपदक निश्चित केले होते. अंतिम सामन्यात तुलिकासमोर स्कॉटलंडच्या साराह एडलिंग्टनचे आव्हान होते. पण, तुलिकाला संधीचं सोनं करता आले नाही आणि तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
तुलिकाचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता. वडीलांच्या हत्या झाली अन् तिच्या खडतर प्रवासाला सुरुवात झाली. १४ वर्षांची असताना तिच्या वडीलांची व्यावसायिक भांडणातून हत्या झाली होती. तिच्या आईने तुलिकाला लहानाचे मोठे केले.