Commonwealth Games 2022 Lakshya Sen Gold : पी व्ही सिंधूच्या सुवर्णपदकानंतर पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात लक्ष्य सेन याच्या कामगिरीकडे होते. प्रकाश पादुकोन ( १९७८), सय्यद मोदी ( १९८२) व परुपल्ली कश्यप ( २०१४) यांच्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरूष एकेरीचे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम लक्ष्य सेनने केला. अंतिम सामन्यात २० वर्षीय लक्ष्य सेनने मलेशियाच्या झी याँग एनजीला कडवी टक्कर दिली. ८ वर्षांनंतर लक्ष्यने भारताला पुरुष एकेरीचे सुवर्णपदक जिंकून दिले. ०-१ अशा पिछाडीवरून लक्ष्य सेनने जबरदस्त कमबॅक केले.
उपांत्य फेरीत मलेशियन खेळाडूने भारताच्या श्रीकांत किदम्बीला पराभूत केले होते. त्यामुळे ऑल इंडिया फायनल होऊ शकली नाही. पण, लक्ष्यने मलेशियन खेळाडूला आज तोडीस तोड उत्तर देण्याचाच निर्धार केलेला दिसला. याँगच्या स्मॅशला लक्ष्य तितक्याच चपळतेने उत्तर देत होता. नेट जवळील सुरेख खेळ दाखवताना याँगने ११-९ अशी आघाडी घेतली. पण, लक्ष्यच्या खेळाचा दर्जा उंचावताना दिसला. याँग वैविध्यपूर्ण फटके मारून भारतीय खेळाडूला संघर्ष करण्यास भाग पाडताना दिसला. दोन्ही खेळाडूंमध्ये सुरेख रॅली रंगली अन् मलेशियन खेळाडूने लक्ष्यला कोर्टच्या चारही बाजूंवर नाचवले. लक्ष्यही चिवट होता आणि त्याने ती रॅली जिंकली. पण, अजूनही आघाडी याँगच्या बाजूने १५-१२ अशी होती. याँगचे बॅकहँड फटके लाजवाब होते आणि त्यात लक्ष्यकडून काही चूकाही झाल्या, परंतु त्यात सुधारणाही त्याने केल्या. गेममध्ये १८-१८ बरोबरी त्याने घेतली. पण, याँगने क्विक हँड मुव्हमेंट दाखवून हा गेम २१-१९ असा घेतला.
दुसऱ्या गेममध्ये लक्ष्य सेनने अप्रतिम क्रॉस स्मॅश लगावून मलेशियन खेळाडूला लोटांगण घालण्यास भाग पाडले. दोघांच्या खेळातील आक्रमकेने स्टेडियममधील चाहत्यांना खिळवून ठेवले होते. याँगचा प्रत्येक वार लक्ष्य परतवून लावत होता. याँगच्या जोरदार स्मॅशला तोड नव्हती. संयम व सातत्य यांचा ताळमेळ राखून लक्ष्यने ११-९ अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतर लक्ष्यने अधिक आक्रमक फटके मारून ही आघाडी १८-९ अशी वाढवली आणि दुसरा गेम २१-९ असा घेत लक्ष्यने सामना १-१ असा बरोबरीत आणला. लक्ष्यने सलग ११ गुण घेतले. तिसऱ्या गेममध्ये आता चुरशीचा खेळ रंगणार हे निश्चित होते. याँग थकलेला दिसला आणि त्याचा फायदा लक्ष्यला उचलायचा होता. त्याने आपल्या खेळात वैविधता दाखवली अन् मलेशियन खेळाडूला आश्चर्याचा धक्का दिला. दोघांमध्ये रॅलीचा सुरेख खेळ झाला. स्मॅश, परतीचे फटके, बँकहँग, फोरहँड असे सर्व फटके रॅलीत दिसले. लक्ष्यकडे ११-७ अशी चार गुणांची आघाडी होती.
याँगने पाच गुण घेऊन सामना १२-१७ असा अटीतटीचा करण्याचा प्रयत्न केला, परंतु लक्ष्य आता मागे हटण्यातला नव्हता. पण, दोघांमधील खेळ हा अव्वल दर्जाचा झाला. याँगच्या गुडघ्याला दुखापत झालेली आणि तरीही त्याने संघर्ष केला. लक्ष्यने १९-१४ अशी आघाडी घेतली. याँगने सलग दोन गुण घेताना १६-१९ असी टफ फाईट दिली, परंतु लक्ष्यने मॅच पॉईंट घेतला. त्यानंतर २१-१६ असा विजय मिळवून सुवर्णपदक नावावर केले.
लक्ष्य सेनसाठी मागील एक वर्ष स्वप्नवत ठरले आहे. उत्तराखंडच्या या खेळाडूने २०१८मध्ये आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीचे सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर युथ ऑलिम्पिक स्पर्धेत मिश्र सांघिक गटाचेही सुवर्णपदक त्याच्या नावावर आहे. २०२१मध्ये त्यने जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून दिग्गजांना पाणी पाजले होते. २०२२च्या ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेतील तो उपविजेता होता. भारताच्या थॉमस कप २०२२ विजेत्या संघाचाही तो सदस्य होता.
#Badminton भारताने बॅडमिंटनमध्ये सिंधूचं पदक वगळता १ रौप्य व दोन कांस्यपदकांची कमाई केली आहे. पुरुष एकेरीत श्रीकांत किदम्बीने कांस्यपदकाच्या लढाईत सिंगापूरच्या जिआ हेंग तेहचा २१-१५, २१-१८ असा पराभव केला. महिला दुहेरीच्या कांस्यपदकाच्या लढतीत जॉली त्रिसा व गायत्री गोपिचंद यांनी ऑस्ट्रेलियन जोडीचा २१-१५, २१-१८ असा पराभव केला. मिश्र सांघिक गटात भारताला सुवर्णपदकाच्या सामन्यात मलेशियाकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला.