Commonwealth Games 2022 Para Table Tennis : भारताच्या भाविना पटेलने ( Bhavina Hasmukhbhai Patel) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा टेबल टेनिस क्लासेस 3-5 गटाचे सुवर्णपदक नावावर केला. टोक्यो पॅरिलिम्पिक स्पर्धेत क्लास 4 टेबल टेनिसमध्ये विक्रमी रौप्यपदक जिंकणाऱ्या भाविनाने राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नायजेरियाच्या इफेचक्वूदे ख्रिस्टियन इक्पेओयीचा १२-१०, ११-२, ११-९ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. भारताच्या सोनालबेन पटेलने पॅरा टेबल टेनिस एकेरी classes 3-5 मध्ये इंग्लंडच्या सूई बेलीला पराभूत करून कांस्यपदक जिंकले. भारताने आतापर्यंते एकूण १३ सुवर्ण, ११ रौप्य व १८ कांस्यपदकांची कमाई केली आहे.
भाविनाने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदकांची कमाई केली आहे. २०११मध्ये PTT थायलंड ओपन स्पर्धेत तिने वैयक्तिक गटात रौप्यपदक जिंकून जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले होते. २०१३ मध्ये आशियाई पॅरा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या क्लास 4 गटात रौप्यपदकाची कमाई केली. २०१७मध्ये आशियाई पॅरा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्देत तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. टोक्योत तिने रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला.
#Boxing मोहम्मद हुस्सामुद्दीनला उपांत्य फेरीत घानाच्या बॉक्सरकडून १-४ अशी हार मानावी लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक पदक विजेत्या निखत झहीरनने ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करताना इंग्लंडच्या सवानाह अल्फीया स्टुबलीचा ५-० असा पराभव केला. ५७ किलो वजनी गटात जास्मिन लाम्बोरीयाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. इंग्लंडच्या गेम्मा पेग रिचर्डसनने अटीतटीच्या सामन्यात ३-२ असा विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला.
#Squash मागील राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या दीपिका पल्लिकल व सौरव घोषाल या भारतीय जोडीला मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत जोएल किंग व पॉल कोलकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. या दोघांना आता कांस्यपदकाच्या लढतीत खेळावे लागेल.
#Lawn Bowls महिलांनी लॉन बॉल स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर पुरुष संघाच्या अंतिम फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुनील बहादूर, नवनीत सिंग, चंदन कुमार सिंग व दिनेश कुमार या भारतीय संघासमोर सुवर्णपदकासाठी नॉर्दन आयर्लंडचे आव्हान होते. भारतीय खेळाडूंनी अखेरपर्यंत प्रयत्न केले, परंतु त्यांना ५-१८ अशा पराभवामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
#TableTennis अचंथा शरथ कमल व श्रीजा अकुला या जोडीने मिश्र दुहेरीच्या अंतिम पेरीत प्रवेश केला. त्यांनी निकोलस लूम व मिनहायींग जी यांच्यावर ११-९, ११-८, ९-११, १२-१४, ११-७ असा पराभव केला. अचंथा शरथ कमल व साथियन ज्ञानसेकरन या जोडीने पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. भारतीय जोडीने ८-११, ११-९, १०-१२, ११-१,११-८ अशा फरकाने ऑस्ट्रेलियाच्या लम निकोलस व लू फिन यांचा पराभव केला.
#Badminton महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या पी व्ही सिंधूला संघर्ष करावा लागला. मलेशियाच्या जिन वेई गोहने पहिला गेम २१-१९ असा जिंकल्यानंतर ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने २१-१४ अशा विजयासह पुनरागमन केले. तिसरा गेम कमालीचा चुरशीचा झाला, परंतु सिंधूने सातत्यपूर्ण खेळ करताना हा गेम २१-१८ असा जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.
#Athletics महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. दृती चंद, हिमा दास, सराबनी नंदा व ज्योती याराजी यांनी ४४.४५ सेकंदासह हिटमध्ये दुसरे स्थान पटकावले.