Commonwealth Games 2022 : भारताच्या प्रियांका गोस्वामीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. तिने ४३ मिनिटे ३८.८३ सेकंदाची वेळ नोंदवताना हे पदक जिंकले. ही तिची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली.
उत्तर प्रदेशच्या २६ वर्षीय प्रियांकाने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत ती १७वी आली होती. अॅथलेटिक्समध्ये येण्यापूर्वी प्रियांका जिम्नॅस्टीक्स करायची. तिने धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्यास सुरुवात केली, कारण यामध्ये जिंकणाऱ्याला बक्षीस म्हणून बॅग दिल्या जायच्या. फेब्रुवारी २०२१मध्ये तिने भारतीय रेसवॉकिंग अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आणि १:२८.४५ असा राष्ट्रीय विक्रम नोंदवला आणि २०२०च्या ऑलिम्पिकची पात्रता निश्चित केली होती.
#Boxing भारताच्या नितू घंघासने ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात तिने कॅनडाच्या प्रियांका ढिल्लॉनवर सहज विजय मिळवला. अमित पांघलनेही ५१ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत झाम्बियनच्या पॅट्रीक चिनयेम्बावर ५-० असा एकहाती विजय मिळवला.