Commonwealth Games 2022 men's 10000m Race Walk : नितू व अमित पांघल या बॉक्सर्सनी रविवारी भारताला दोन सुवर्णपदक जिंकून दिले. महिला हॉकी संघानेही इतिहास घडविताना कांस्यपदकाची कमाई केली. त्यापाठोपाठ अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या तिहेरी उडीत एलडोस पॉल व अब्दुल्ला अबूबाकेर अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक निश्चित केले. तिहेरी उडीत कांस्यपदकाने हुलकावणी दिली असली तरी पुरुषांच्या १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमारने ( Sandeep Kumar) सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद करून कांस्यपदक जिंकले. प्रियांका गोस्वामीने महिलांच्या १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत काल रौप्यपदकाची कमाई केली होती.
#Men's 10,000m Race Walk - Final भारताच्या प्रियांका गोस्वामीने शनिवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. तिने ४३ मिनिटे ३८.८३ सेकंदाची वेळ नोंदवताना हे पदक जिंकले. ही तिची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली होता. आज पुरुषांच्या अंतिम सामन्यात संदीप कुमार ( Sandeep Kumar) याने पहिले १००० मीटरचे अंतर ३ मिनिटे ४९.२९ सेकंदात पार करून आघाडी घेतली होती. दुसऱ्या व तिसऱ्या स्प्लिटमध्ये कॅनडा व केनियाच्या खेळाडूंनी आघाडी घेतली, परंतु ४००० मीटरनंतर पुन्हा संदीप आघाडीवर आला.
संदीपने २०१५च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ५० किलोमीटर शर्यतीत सहभाग घेतला होता. २०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत तो ३५ वा आला होता. २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने २० किलोमीटर शर्यतीत २३वे स्थान पटकावले होते. सध्या ५० किमी व २० किमी चालण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम त्याच्या नावावर आहेत. संदीपने आघाडी कायम राखताना पदकाच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले होते. ५००० मीटरनंतरही तो १९:२३.५३ सेंकदासह आघाडीवर होता.
ऑस्ट्रेलियाच्या डेक्लॅन टिंगेने ६००० मीटरनंतर आघाडी घेतली आणि अन्य स्पर्धक व त्याच्यात मोठा गॅप प्रकर्षाने दिसत होता. संदीप दुसऱ्या क्रमांकावर होता, परंतु केनियन खेळाडूचे त्याच्या कडवे आव्हान होते. ७००० मीटरनंतरही ऑसी खेळाडूची आघाडी कायम होती. पण, भारतीय खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर सरकला. त्याने तिसरे स्थान कायम राखताना कांस्यपदक जिंकले. संदीपने 38:49.21 मिनिटे अशी वेळ नोंदवली.