Commonwealth Games 2022 : पी व्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी अनुक्रमे महिला व पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या एकाच पर्वात पुरुष व महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुरुष दुहेरीच्या सुवर्णपदकाच्या लढतीत सात्विक साईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी यांच्यासमोर इंग्लंडची लॅन बेन व व्हेंडी सीन ही जोडी उभी होती.
भारतीय जोडीने पहिला गेम २१-१५ असा जिंकून आघाडी घेतली, परंतु दुसऱ्या गेममध्ये इंग्लंडच्या जोडीने कडवी टक्कर दिली. पण हाही गेम २१-१३ असा जिंकून भारतीय जोडीने सुवर्णपदक नावावर केले. २०१८ मध्ये त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
#WomensSingle पी व्ही सिंधूने अंतिम सामन्यात कॅनडाच्या मिशेल ली हिच्यावर २१-१५, २१-१३ असा विजय मिळवून राष्ट्रकुल स्पर्धेतील तिचे पहिले वैयक्तिक सुवर्णपदक निश्चित केले. डबल ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेत २०१८मध्ये मिश्र सांघिक गटाचे सुवर्णपदक जिंकले आहे. २०१८मध्ये तिला महिला एकेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. २०१४मध्ये तिने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले होते. २०२२मध्ये तिला मिश्र सांघिक गटाचे सुवर्णपदक कायम राखता आले नाही आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
#MensSingle पुरुष एकेरीची अंतिम लढत कमालीची चुरशीची झाली. लक्ष्य सेनने पहिला गेम १९-२१ असा गमावला आणि त्यानंतर त्याने मलेशियाच्या झी याँग एनजीला कडवी टक्कर दिली. लक्ष्यने १९-२१, २१-९, २१-१६ अशा विजयासह राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्याच सहभागात पुरूष एकेरीचे सुवर्णपदक निश्चित केले. प्रकाश पादुकोन ( १९७८), सय्यद मोदी ( १९८२) व परुपल्ली कश्यप ( २०१४) यांच्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरूष एकेरीचे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम लक्ष्य सेनने केला.
#Badminton या पदकांशिवाय भारताने १ रौप्य व दोन कांस्यपदकांची कमाई केली आहे. पुरुष एकेरीत श्रीकांत किदम्बीने कांस्यपदकाच्या लढाईत सिंगापूरच्या जिआ हेंग तेहचा २१-१५, २१-१८ असा पराभव केला. महिला दुहेरीच्या कांस्यपदकाच्या लढतीत जॉली त्रिसा व गायत्री गोपिचंद यांनी ऑस्ट्रेलियन जोडीचा २१-१५, २१-१८ असा पराभव केला. मिश्र सांघिक गटात भारताला सुवर्णपदकाच्या सामन्यात मलेशियाकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला.