Commonwealth Games 2022 Shushila Devi Likmabam Judo : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्स पदकांची लयलूट करत असताना ज्युदोतही ( Judo) अनपेक्षित कामगिरी पाहायला मिळाली. २०१४च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या २७ वर्षीय सुशीला देवी लिकमाबामने ४८ किलो वजनी गटात भारतासाठी आणखी एक पदक मिळवून दिले. सुशीलाने उपांत्य फेरीत मॉरिशियसच्या प्रिस्किला मोरँडावर विजय मिळवून अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. अंतिम फेरीत सुशीलासमोर दक्षिण आफ्रिकेच्या मिचेला व्हाईटबू हिचे आव्हान होते. आफ्रिकन खेळाडू वरचढ ठरली आणि भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
इम्फाल येथे एका सामान्य कुटुंबातिली सुशीला देवीचा जन्म... काका लिकमाबाम दिनित हे आतंररष्ट्रीय ज्युदोपटू असल्याने सुशीलाही या खेळाकडे आकर्षित झाली आणि तिने पदकांची कमाई केली. २०१४ च्या राष्ट्रकुल रौप्यपदकासह तिच्या नावावर दोन आशियाई खुल्या अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदकंही आहेत. २०१८मध्ये तिने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पहिले रौप्य जिंकले आणि तिला मणिपूर पोलिसांत नोकरी मिळाली. २०१९ मध्ये तिने याच स्पर्धेत आणखी एक रौप्यपदक जिंकले. त्याच वर्षी तिने राष्ट्रकुल ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती भारताची एकमेव ज्युदोपटू होती.
CWG 2022मध्ये सुशीला व्यतिरिक्त विजय कुमार यादव ( ६० किलो), जसलीन सिंग सैनी ( ६६ किलो) व सुचिका तरियाल ( ५७ किलो महिला गट) हे कांस्यपदकाच्या शर्यतीत होते. विजय कुमारने ६० किलो वजनी गटाच्या लढतीत सायप्रसच्या पेट्रोसवर विजय मिळवून कांस्य निश्चित केले. भारताची एकूण पदकसंख्या ८ झाली आहे.
सुशीलाचा प्रेरणादायी प्रवास...ज्युदो फेडरेशन केवळ जागतिक व आशियाई स्पर्धेकरीता खेळाडूंचा खर्च उचलतात, परंतु या स्पर्धांसाठीच्या पात्रता स्पर्धेसाठी खेळाडूंना आपापला खर्च उचलावा लागलो. सुशीलाने अशाच एका सर्धेसाठी कर्ज काढले आणि स्वतःजवळील कारही विकली होती. हा ऑलिम्पिक खेळ नसल्याने प्रायोजकही यात गुंतवणूक करत नाहीत. कोरोनामुळे सुशीलाच्या सरावाला ब्रेक लागला होता. मात्र, तिने घरातच ज्युदोसाठी सेट अप उभा केला.. तिने प्रशिक्षकांकडून जुना मॅट उसना घेतला आणि सराव केला.