Commonwealth Games 2022 Table Tennis : पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात अचंथा शरथ कमल व साथियन ज्ञानसेकरन ( ACHANTA Sharath Kamal / GNANASEKARAN Sathiyan) या जोडीने विक्रमी पदक जिंकले. भारताने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये तीन सुवर्ण, तिहेरी उडीत सुवर्ण व रौप्य, १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्य, महिलांच्या भालाफेकीत कांस्य आणि महिला हॉकीत कांस्य अशी ८ पदकांची कमाई केली होती. त्यात टेबल टेनिसच्या पदकाची भर पडली. शरथ कमल व साथियन यांना या पदकासाठी संघर्ष करावा लागला. इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉल व लिएम पिचफोर्ड यांनी कडवी टक्कर दिली. भारतीय जोडीने पहिला गेम ११-८ असा जिंकला, परंतु इंग्लंडच्या खेळाडूंनी पुढील दोन गेम ११-८ व ११-३ असे जिंकून सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. त्यामुळे चौथा गेम निर्णायक होता आणि त्यात भारतीय जोडीने झोकून खेळ केला. हा गेम ११-७ असा जिंकून भारताने लढत २-२ अशी बरोबरीत आणली. पाचव्या गेममध्ये ३-३ अशा बरोबरीनंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी ८-४ अशी आघाडी घेतली. इंग्लंडच्या जोडीने ११-४ असा विजय मिळवून सुवर्णपदक नावावर केले. भारतीय जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
शरथ कमलने आतापर्यंत सहभाग घेतलेल्या प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची कमाई केली आहे. टेबल टेनिस संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या शरथ कमलने आतापर्यंत ५ सुवर्ण, दोन रौप्य व ३ कांस्य अशी एकूण १० पदकांची कमाई केली आहे. २००६मध्ये त्याने पुरुष एकेरीत व पुरुष सांघिक गटाचे सुवर्ण जिंकले होते. २०१०मध्ये पुरुष दुहेरीत सुवर्ण, २०१८ व २०२२ मध्ये पुरूष सांघिक गटाचे सुवर्ण त्याच्या नावावर आहे. २०१४ व २०१८मध्ये पुरुष दुहेरीत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. २०१०मध्ये पुरुष सांघिक, २०१८मध्ये पुरुष एकेरी व २०१८ मिश्र दुहेरीत कांस्य जिंकले आहे.
#TableTennis भारताच्या युवा टेबल टेनिसपटू श्रीजा अकुलाला चिवट खेळीनंतर कांस्यपदकाच्या लढतीत हार मानावी लागली. श्रीजाला महिला एकेरीच्या कांस्यपदकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या यांगजी लियूकडून ११-३, ६-११, २-११, ११-७, १३-१५, ११-९, ७-११ असा पराभव पत्करावा लागला.