Commonwealth Games 2022 Boxing : नितू आणि अमित पांघल यांनी बॉक्सिंगमधील सुवर्णपदकाचे खाते उघडल्यानंतर सर्वांच्या नजरा होत्या त्या निखत जरीनवर ( Nikhat Zareen) हिच्या कामगिरीवर. विश्वविजेत्या निखतसमोर नॉर्दन आयर्लंडच्या कार्ली मॅक नॉलचे आव्हान होते. बचाव व आक्रमण याचा सुरेख संगम राखताना निखतने आयर्लंडच्या बॉक्सरचला चकवले होते. पहिल्या राऊंडमध्ये निखतने वर्चस्व गाजवले होते. सर्व ५ पंचांकडून तिने १०पैकी १० गुण घेतले होते.
दुसऱ्या राऊंडमध्ये मॅक नॉलने जोरदार पंच मारून सामन्यातील चुरस वाढवली. निखत आपली ऊर्जा वाचवून खेळ करताना दिसली, ती तिसऱ्या राऊंडसाठी सर्व ताकद वाचवून होती. दुसऱ्या राऊंडमध्येही पंचांचा निकाल निखतच्या बाजूनेच होता आणि तिला तिसऱ्या राऊंडमध्ये सातत्य राखून सुवर्णपदकावरील पकड मजबूत करायची होती. निखतने तिच्यापेक्षा ७ वर्ष वयाने मोठ्या असलेल्या खेळाडूला थकवून बाजी मारली. या वजनी गटात मेरी कोमने कधीकाळी वर्चस्व गाजवले होते. त्या कॅटेगरीत आता निखत दबदबा सिद्ध करतेय.
विश्वविजेती निखत जरीनने समाजाच्या जुन्या रुढींना चपकार देत बॉक्सर होण्याचा निर्णय घेतला. मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या निखतने तिच्या समाजातील मुलींसमोर एक आदर्श ठेवला आहे. तिचे वडील मोहंमद जमील स्वत: खेळाडू होते. ते फुटबॉल, क्रिकेट खेळत. त्यांना चार मुली. निखत तिसरी. आपल्या मुलींनीही खेळावं असं त्यांना वाटे. पण बाकी मुलींना खेळाचा ध्यास नव्हता, आवडीपुरता खेळ मर्यादित राहिला. निखतमध्ये मात्र ते पॅशन होतं.
वयाच्या १४ व्या वर्षी ती वर्ल्ड युथ चॅम्पिअन झाली. खेळत होती. साईचं प्रशिक्षणही मिळालं. उत्तम कोचही लाभले. त्यात घरात तिचे काका बॉक्सर. त्यांची मुलं इथेशामुद्दीन आणि इमीशामुद्दीन दोघे बॉक्सर. निजामाबादच्या या कुटुंबाला खेळाचं वेड होतं. पण तेलंगणातल्या छोट्या शहरात मुलांनी खेळण्याला हरकत नव्हती, मुलींनी खेळाचं मात्र भवताली सर्वांनाच वावडं होतं. त्यात लहान लहान कपडे घालून मुलगी घराबाहेर खेळायला जाते हे तर फारच खूपत होतं. वडील मात्र निखतच्या मागे उभे राहिले.
#Boxing अमित पांघलने ( Amit Panghal) टोक्योतील निराशाजनक कामगिरी मागे टाकून आज कमाल केली. ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात अमितने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना इंग्लंडच्या किएरन मॅकडोनाल्डला हतबल केले. पहिला राऊंड अमितने सहज जिंकला, परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये मॅकडोनाल्डने संघर्ष दाखवला. तिसऱ्या राऊंडमध्ये सुरुवातीला डिफेन्सिव्ह खेळ केल्यानंतर अमितने अचानक अखेरच्या ४० सेकंदात जोरदार ठोसे मारले. अमितने ५-० असा विजय मिळवून सुवर्णपदक पक्के केले.