Commonwealth Games 2022 Weightlifting : भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मंगळवारी लॉन बॉल ( Lawn Bowls) स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. त्यापाठोपाठ टेबल टेनिसमध्ये पुरुष संघाने सुवर्ण कामगिरी केली आणि वेटलिफ्टिंगमध्ये आणखी एक पदक भारताला मिळाले. विकास ठाकूरने ( Vikas Thakur) भारतासाठी रौप्यपदक जिंकले. विकास हा राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताचा सर्वात अनुभवी वेटलिफ्टर आहे. त्याने २०१४ च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य आणि २०१८च्या गोल्ड कोस्ट स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे.
#Weightlifting पुरूषांच्या ९६ किलो वजनी गटात विकास ठाकूर भारताला पदक मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याने स्नॅच प्रकारात सुरुवातीला १४९ किलो वजन सहज उचलले. त्यानंतर त्यात ४ किलोंची भर घालताना त्याने १५३ किलो वजनही उचलून दणक्यात सुरुवात केली. तिसऱ्या प्रयत्नात आणखी भार वाढवून त्याने १५५ किलोची उचल केली. पण, त्याच्यासमोर फिजीच्या तानिएला रैनीबोगी व इंग्लंडच्या सिरिल टीचॅट्चे यांचे आव्हान होते.
रैनीबोगीचा १६० किलो वजन उचलण्याचा तिसरा प्रयत्न फसला अन् त्यालाही स्नॅचमध्ये १५५ किलो या सर्वोत्तम उचलवर समाधान मानावे लागले. पण, सॅमोआच्या डॉन ओपेलॉगने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात १६१ किलो भार उचलून स्पर्धा विक्रमाची नोंद केली. सिरिलचा १६२ किलोचा प्रयत्न अयशस्वी ठरला अन् त्याला १५८ किलो सर्वोत्तम कामगिरीवर समाधान मानावे लागले. भारतीय वेटलिफ्टर विकाससमोर या तिघांचे कडवे आव्हान होते. ओपेलॉग इथेच थांबला नाही तर त्याने पुढील दोन प्रयत्नांत १६६ व १७१ किलोची उचल करून अन्य स्पर्धक व त्याच्या वजनातील अंतर खूप वाढवून ठेवले.
आता क्लिन अँड जर्कमध्ये खरी चुरस रंगणार होती. विकासने पहिल्याच प्रयत्नात १८७ किलो भार उचलून एकूण ३४२ किलो वजनासह आघाडी घेतली होती, परंतु रैनीबोगीने १८८ किलोचा भार उचलून एक किलोच्या फरकाने भारतीय खेळाडूला मागे टाकले. विकासने दुसऱ्या प्रयत्नात १९१ किलो भार उचलला आणि ३४६ किलोसह रौप्यपदक नावावर केले.
२०१३ पासून त्याने राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत १ सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्यपदक जिंकली आहेत. तो सात वेळा राष्ट्रीय विजेताही आहे.