Commonwealth Games 2022 Weightlifting Harjinder Kaur : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्स पदकांची लयलूट करत आहेत. सोमवारी ज्युदोच्या दोन पदकांची भर पडली. २७ वर्षीय सुशीला देवी लिकमाबामने ४८ किलो वजनी गटात भारतासाठी रौप्यपदक जिंकले, तर विजय कुमारने कांस्यपदकाची कमाई केली. भारताच्या बॅडमिंटनपटूंनीही मिश्र सांघिक गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करताना एक पदक निश्चित केले. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ७१ किलो वजनी गटात हरजिंदर कौरने कांस्यपदक जिंकल्याने भारताची पदकसंख्या ९ झाली आहे.
क्लिन अँड जर्कमध्ये हरजिंदरने ११३, ११६ व ११९ किलो असे भार उचलून एकूण २१२ किलोंसह दुसरे स्थान पटकावले होते. कॅनडाची अॅलेक्सी अॅशवर्थ ( ९१ + १२३ किलो) एकूण २१४ किलोसह अव्वल स्थानावर होती. नायजेरियाच्या जॉय ऑगबोनेचा शेवटचा ११४ किलोचा प्रयत्न फसल्याने हे भारतीय स्पर्धक पदकाच्या शर्यतीत कायम राहिली. इंग्लंडच्या साराहने पहिल्याच प्रयत्नात १२६ किलो भार उचलून स्पर्धा विक्रम नोंदवला. तिने एकूण २२९ किलो उचल करून स्पर्धा विक्रम नोंदवताना सुवर्णपदक नावावर केले.
- #Judo २०१४च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या सुशीलासमोर अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या मिचेला व्हाईटबू हिचे आव्हान होते. आफ्रिकन खेळाडू वरचढ ठरली आणि भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. विजय कुमार यादव ( ६० किलो)ने ६० किलो वजनी गटाच्या लढतीत सायप्रसच्या पेट्रोसवर विजय मिळवून कांस्य निश्चित केले.
- #Boxing भारताचा बॉक्सर अमित पांघल याने ५१ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने नामरी बेरीरवर ५-० असा विजय मिळवला. आता तो पदकापासून एक विजय दूर आहे.
- #Squash जोश्ना चिनप्पाचा महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव. कॅनडाच्या हॉली नॉघटनचा ११-९, ११-५ व १५-१३ असा विजय
- #Hockey भारतीय पुरुष हॉकी संघाने ४-१ अशी आघाडी असूनही इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ४-४ अशा बरोबरीवर समाधान मानले. दुसऱ्या हाफमध्ये भारतीय खेळाडूंचा खेळ सुमार झाला
- #Squash सौरव घोषालने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंडच्या ग्रेग लोबानचा ११-५, ८-११, ११-७, ११-३ असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक दिली.