नवी दिल्ली: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय कुस्तीपटूंनी चमकदार कामगिरी केली आहे. खेळाडूंनी आतापर्यंत 6 सुवर्णांसह 12 पदके आपल्या नावे केली आहेत. यात महिला कुस्तीपटू दिव्या काकरने कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे. 23 वर्षीय दिव्या काकरनने कांस्यपदकाच्या लढतीत टोंगाच्या टायगर लिली कॉकर लेमालियरचा 30 सेकंदात पराभव केला.
दिव्या काकरनला 68 किलो फ्रीस्टाइलच्या उपांत्यपूर्व फेरीत तांत्रिक गुणांच्या(0-11) आधारावर नायजेरियाच्या ब्लेसिंग ओबोरुद्दूकडून पराभव पत्करावा लागला. नंतर, ब्लेसिंग ओबोरुदुडूने अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्यामुळे दिव्याला रिपेचेज खेळण्याची संधी मिळाली. यात तिने सलग दोन सामने जिंकून कांस्यपदक पटकावले. या विजयानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिव्या काकरनचे अभिनंदन केले.
अरविंद केजरावीलांकडे मागणीदरम्यान, दिव्या काकरनने अरविंद केजरीवाल यांच्या अभिनंदनावर प्रतिक्रिया देताना आपली व्यथा मांडली आहे. दिव्याने ट्विट केले की, 'पदकाचे अभिनंदन केल्याबद्दल दिल्लीच्या माननीय मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार. पण, माझी तुम्हाला एक विनंती आहे की, मी गेली 20 वर्षे दिल्लीत राहून माझ्या कुस्तीचा सराव करत आहे. पण आजपर्यंत मला राज्य सरकारकडून बक्षिसाची रक्कम आणि इतर कोणतीही मदत देण्यात आलेली नाही.
दिव्या पुढे म्हणाली, 'माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री असूनही इतर कोणत्याही राज्यातून खेळणाऱ्या खेळाडूंचा ज्या प्रकारे सन्मान करता, तसाच माझाही सन्मान झाला पाहिजे.'
दिव्या काकरन यांनी अरविंद केजरीवाल यांच्याकडे तक्रार करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2018 मध्ये दिव्या काकरनने आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते, तेव्हाही तिने जाहीरपणे तिची व्यथा मांडली होती. तेव्हा ती म्हणाली होते, 'मी वयाच्या 19 व्या वर्षी देशाला सुवर्णपदक मिळवून दिले आणि दिल्लीला सलग 12 पदके दिली. तुम्ही म्हणाला होता कीस मला भविष्यात मदत मिळेल पण तसे झाले नाही.'