Commonwealth Games 2022 Wrestling : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या कुस्तीपटूंनी तीन सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशी विक्रमी कामगिरी केली. शनिवारी पूजा गेहलोतने त्यात आणखी एका कांस्यपदकाची व रवी दहियाने सुवर्णपदकाची भर घातली. भारताचे हे १०वे सुवर्णपदक ठरले. ५३ किलो वजनी गटातील सुवर्णपदकाच्या लढतीत विनेश फोगाटसमोर श्रीलंकेच्या चमोद्या केशानी मदुरावेलागेचे आव्हान होते. विनेशने पहिल्याच प्रयत्नात प्रतिस्पर्धीला पाठीवर टेकवण्याचा डाव टाकून ४-० अशी आघाडी घेतली. चमोद्याला विनेशची पकड सोडवता आली नाही आणि ती पूर्णपणे हतबल दिसली. विनेशने दीड मिनिटांत पक्के केले सुवर्णपदक.
विनेश फोगाट ही राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेची सुवर्णपदकं नावावर असलेली भारताची एकमेव महिला कुस्तीपटू आहे. लौरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्डसाठी नामांकित झालेल्या पहिल्या भारतीय खेळाडूचा मानही विनेशचाच आहे. विनेशने २०१९च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे कांस्यपदक जिंकले आहे. शिवाय २०१४ व २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण, २०१८च्या आशियाई स्पर्धेतील सुवर्ण व २०१४ चे कांस्यपदक तिच्या नावावर आहेत. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत विनेशने १ सुवर्ण, ३ रौप्य व ४ कांस्यपदकं जिंकली आहेत.
#Wrestling रवी दहियाने ( Ravi Kumar Dahiya ) ५७ किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीत एकहाती बाजी मारली. त्याने नायजेरीयाच्या वेल्सन एबिकेवेनिमोला पराभूत केले. वेल्सननेही राष्ट्रकुल स्पर्धेत दोन रौप्यपदक जिंकले आहेत आणि आजही त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. रवी दहिया प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाला होता आणि त्याने सुवर्णपदकाच्या लढतीत सुरुवातीला सावध खेळ करताना रवीने पकड करण्याचा प्रयत्न केला. रवीने जबरदस्त पकड करून नायजेरियाच्या खेळाडूला चार वेळा गिरकी घेण्यास भाग पाडून ८-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर दोन गुण घेत सुवर्णपदक पक्के केले.
#Wrestling ५० किलो वजनी गटाच्या कांस्यपदकाच्या लढतीत पूजा गेहलोत व स्कॉटलंडच्या ख्रिस्टली लेमोफॅक यांच्यात लढत होती. स्कॉटलंडच्या खेळाडूने प्रथम दोन गुण घेतले. पण, पूजाने एक डाव टाकला अन् स्कॉटलंडच्या खेळाडूला चारवेळा गिरकी घेण्यास भाग पाडून ८-२ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत पुजाने लेक अटॅक करून आणखी ४ गुण घेत ही लढत १२-२ अशी जिंकली. २०१९च्या २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पूजाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी कुस्तीतीत आजचे दुसरे कांस्यपदक निश्चित केले.