बर्मिंगहॅम : २२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला गुरुवारी शानदार सोहळ्याद्वारे सुरुवात होईल. यासाठी भारताच्या २१३ जणांच्या पथकासह ७२ हून अधिक देश सहभागी होत आहेत. पाच हजारांहून अधिक खेळाडू तब्बल ११ दिवस १९ क्रीडा प्रकारात २८० सुवर्ण पदकांसाठी एमेकांशी भिडतील. भारताकडून पी. व्ही. सिंधू, मनिका बत्रा यांच्यासह अनेक स्टार्स मैदानावर आपली ताकद आजमावतील.
यंदाच्या स्पर्धेत पुरुषांच्या तुलनेत महिला खेळाडूंना अधिक सुवर्णपदके दिली जातील. महिला गटात १३६, तर पुरुष गटात १३४ सुवर्ण वितरित केले जातील. मिश्र प्रकारात दहा सुवर्णपदके असतील. यंदाचे आकर्षण महिला क्रिकेट असेल. विश्वविजेते ऑस्ट्रेलिया सुवर्ण पदकासाठी प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघही सुवर्ण पदकाच्या शर्यतीत आहे. मागच्या स्पर्धेत भारताने ६६ पदके जिंकली होती.
नीरज, सायना, मेरीकोमसह ‘हे’ दावेदार मुकणार
सुवर्ण पदकाचा दावेदार भालाफेकपटू नीरज चोप्रा, विश्वविजेती बॉक्सर मेरीकोम, ‘फुलराणी’ सायना नेहवाल यांच्यासह अनेक स्टार यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेत दिसणार नाहीत. अनुभवी मेरीकोम गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत आहे. मागच्यावेळी ती चॅम्पियन होती. सायनाने राष्ट्रकुलची चाचणी दिली नव्हती. ती २३ व्या स्थानी आहे. १५ च्या वर रॅंकिंग खेळाडूंना चाचणी देणे अनिवार्य आहे. महिला हॉकीतील स्टार राणी रामपाल पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने संघात नाही. गोळाफेकपटू तेजिंदर तूर पाठदुखीमुळे त्रस्त आहे. थॉमस चषक बॅडमिंटनचे ऐतिहासिक जेतेपद मिळवून देणारा एच. एस. प्रणॉय याची भारतीय संघात निवड झाली नाही.
सिंधू बनणार ध्वजवाहकस्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ही राष्ट्रकुल स्पर्धा उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाची ध्वजवाहक असेल. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने बुधवारी सिंधूची घोषणा केली. उद्घाटन सोहळ्यात भारताचे १६४ खेळाडू सहभागी होतील. २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेतही सिंधू ध्वजवाहक होती. ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा याची याआधी ध्वजवाहक म्हणून निवड झाली होती. मात्र, मांडीच्या दुखापतीमुळे त्याने राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर सिंधूकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली.