नवी दिल्ली : बर्मिंगहॅम (२०२२) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजी वगळण्यात आल्यानंतर भारताने कडवा विरोध दर्शविला. त्याचा परिणाम म्हणून राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भारताला सोपविले जाण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने (सीजीएफ) भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (आयओए) यासंदर्भात औपचारिक प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. हा प्रस्ताव जानेवारीच्या सुरुवातीला सीजीएफच्या क्रीडा समितीपुढे मांडण्यात येणार असून, मंजुरीसाठी कार्यकारी समितीकडे पाठविला जाईल.
ही सकारात्मक प्रतिक्रिया ५ डिसेंबर रोजी म्युनिच येथे सीजीएफ आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघादरम्यान (आयएसएसएफ) झालेल्या बैठकीनंतर आली आहे. आयओए प्रमुख नरिंदर बत्रा यांना लिहिलेल्या पत्रात सीजीएफ प्रमुख म्हणाले,‘भारतीय राष्टÑीय रायफल महासंघाचे अध्यक्ष रानिंदर सिंग आणि ब्लादिमीर लिसिन यांच्यातील चर्चेत हा मुद्दा चर्चेला आला. २०२२ च्या राष्टÑकुल स्पर्धेआधी नेमबाजी राष्टÑकुल चॅम्पियनशिपचे आयोजन भारतात करावे, असे सुचविण्यात आले.’सीजीएफने पत्रात म्हटले की, ‘एनआरएआयने भारत सरकारच्या परवानगीने प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावास मंजुरी मिळताच स्पर्धा आयोजनास सहकार्य केले जाईल. एनआरएआय प्रमुखांनीदेखील या प्रस्तावास होकार दिला आहे. रानिंदर यांनी पत्रात लिहिले की, या प्रस्तावित स्पर्धेमध्ये खेळाडूंना दिली जाणारी पदके राष्टÑकुलमधील पदकांइतकी महत्त्वपूर्ण मानली जावीत.’ प्रस्तावित चॅम्पियनशिपचे आयोजन १४ मार्च २०२२ पासून करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.आयओएने नेमबाजी राष्टÑकुलमधून वगळण्यात येताच, या खेळावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. याशिवाय नेमबाजी स्पर्धांचे आयोजन इतर देशात करावे तसेच ही पदके राष्टÑकुल पदकांच्या खात्यात जमा व्हावी, असा उपायदेखील सुचविला होता.