आॅस्ट्रेलिया येथून ,आशीष जैन -स्टेडियमच्या मार्गावर असताना ‘स्वामी आर्मी’च्या नेतृत्वाखाली जवळजवळ पाच हजार भारतीय चाहत्यांचा मार्च पास्ट बघितल्यानंतर आनंद झाला. हा मार्च पास्ट अल्डर्स पार्कपासून अॅडिलेड ओव्हल स्टेडियमपर्यंत होता. आम्हीही त्या मार्च पास्टमध्ये सामील झालो. त्यात सर्वंच वयोगटातील भारतीय पुरुष व महिलांचा समावेश होता. या मार्च पास्टमध्ये सहभागी चाहते ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करीत टीम इंडियाचे मनोधैर्य उंचावत होते. गर्दीतून मार्ग काढत आम्ही स्टेडियममध्ये प्रवेश केला. मैदान व्यवस्थापन समितीने चांगली व्यवस्था केली होती. स्वयंसेवक दर्जेदार भोजन व शीतपेय उपलब्ध करून देत होते. ज्या स्टँडमध्ये आमचे आसन होते त्या स्टँडमध्ये भारत व पाकिस्तानचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या लढतीचा आनंद घेण्यासाठी उभय देशांचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यातून येथे आले होते. खेळाप्रति असलेला ‘जुनून’ आणि काही घटना हृदयाला भिडणाऱ्या होत्या. राष्ट्रगीत सुरू असताना उभय देशांच्या चाहत्यांनी उभे राहून विश्वबंधुत्वाची प्रचिती दिली. लढत सुरू झाली. उभय संघांदरम्यान मैदानावर चुरस दिसून येत असली तरी स्टँडमध्ये उपस्थित चाहते मात्र खिलाडूवृत्तीचा परिचय देत होते. पाच वर्षांचा चाहता असो किंवा ८० वर्षांचे आजोबा असो, त्यांच्या मुखात ‘जीतेगा भाई जीतेगा, इंडिया जीतेगा’ आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’ हेच नारे होते. उभय देशांचे चाहते राष्ट्रप्रेम व्यक्त करीत होते. प्रत्येक चाहत्याला त्याचा संघ जिंकावा असे वाटत होते, पण लढत रंगतदार होईल, यात मात्र कुणाचे दुमत नव्हते. भारतीय संघाने चमकदार कामगिरी करीत विजय मिळविला, पण शेवटी विजय हा क्रिकेटचा झाला.
स्पर्धा, खिलाडूवृत्तीचा अनोखा मेळ
By admin | Published: February 16, 2015 1:51 AM