ऑनलाइन लोकमत सेंट पीटर्सबर्ग, दि. 3 - विश्वविजेत्या जर्मनीने फुटबॉल जगतावरील आपली हुकूमत पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. 2014 साली झालेल्या फिफा विश्वचषकाच्या विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या जर्मनीने आज झालेल्या कॉन्फेडरेशन्स चषकाच्या अंतिम लढतीत चीलीचा 1-0 असा पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला. शेवटपर्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत 20 व्या मिनिटाला स्टॅनडलने केलेला एकमेव गोल जर्मनीच्या विजयात निर्णायक ठरला.जगज्जेता जर्मनी आणि गेल्या काही वर्षात फुटबॉल जगतात आघाडीच्या संघांमध्ये स्थान मिळवणारा चिलीचा संघ यांच्यातील कॉन्फेडरेशन्स चषकाची अंतिम लढत अपेक्षेप्रमाणे चुरशीची झाली. दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. दरम्यान 20 व्या मिनिटाला मिडफिल्डर स्टॅनडलने गोल करून जर्मनीला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चिलीने बरोबरी साधण्यासाठी आटोकाप प्रयत्न केले पण त्यांना अखेपर्यंत बरोबरी साधता आली नाही. आजच्या विजेतेपदाबरोबरच फुटबॉलमध्ये विश्वचषक आणि कॉन्फेडरेशन्स चषक अशा दोन स्पर्धा जिंकणारा जर्मनी हा फ्रान्स आणि ब्राझील यांच्यानंतरचा तिसरा संघ ठरला आहे. तर तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पोर्तुगालने मेक्सिकोवर 2-1 ने मात करत तिसरे स्थान पटकावले.
जर्मनीने जिंकला कॉन्फेडरेशन्स कप! अंतिम लढतीत चिलीवर केली मात
By admin | Published: July 03, 2017 1:48 AM