पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या विनेश फोगाट हिने ऐतिहासिक कामगिरी करत कुस्तीमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत मुसंडी मारली होती. मात्र अंतिम सामन्याच्या दिवशी निर्धारित वजनापेक्षा १०० ग्रॅम अधिक वजन राहिल्याने विनेश फोगाट हिला स्पर्धेतून बाद करण्यात आले. तसेच तिला पदकापासूनही वंचित करण्यात आले. याविरोधात विनेशने दाद मागितली होती. मात्र तिचं अपील फेटाळलं गेलं. दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर आज भारतात दाखल झालेल्या विनेश फोगाट हिचं जोरदार स्वागत करण्यात आलं. उल्लेखनीय बाब म्हणजे विनेश हिच्या स्वागताला तिचे कुटुंबीय, कुस्तीपटू सहकारी यांच्यासोबत काँग्रेसचे नेते आणि खासदार दीपेंद्र हुड्डा हेही उपस्थित होते. दरम्यान, दीपेंद्र हुड्डा यांच्या या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट हिच्यासोबत घडलेल्या घटनेमुळे हरयाणामध्ये सध्या संतापाचं वातावरण आहे. तसेच राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली असल्याने येथील राजकीय घडामोडींवरही या घटनेचा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच दीपेंद्र हुड्डा यांचे वडील आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी आमच्याकडे संख्याबळ नाही नाहीतर विनेशला राज्यसभेवर पाठवलं असतं, असं विधान केलं होतं. हुड्डा यांच्या या विधानानंतर सर्वच पक्षांकडून वेगवेगळे दावे केले गेले. तसेच विनेशचे काका महावीर फोगाट यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं होतं.
दरम्यान, राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुस्तिपटूंसोबत घडलेल्या घटनांचं भांडवल करून त्याचा राजकीय लाभ मिळवण्याची खेळी काँग्रेसकडून खेळली जात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच दीपेंद्र सिंह हुड्डा हे विनेशच्या स्वागतासाठी आवर्जुन उपस्थित राहिले होते. कुस्ती हा हरयाणासाठी प्रतिष्ठेचा विषय असून, मागच्या बृजभूषण सिंह सोबत झालेल्या वादानंतर सातत्याने कुस्तीचा मुद्दा हरियाणामध्ये चर्चेत राहिलेला आहे. या मुद्द्यावरून हरयाणामध्ये भाजपा बॅकफूटवर आहे. त्याचा फायदा घेण्याची तयारी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. विनेशच्या माध्यमातून काँग्रेस महिला, तरुणी आणि जाट समाजाला आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नात आहे. खाप पंचायतींनीही विनेशला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे या सर्व वर्गाला एक सकारात्मक संदेश देऊन मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
दरम्यान, विनेशच्या स्वागतासाठी पोहोचलेल्या दीपेंद्र हुड्डा यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, विश्वविजेत्या कुस्तिपटूला पराभूत करून देशात आलेली देशाची लेक आणि हरयाणाची वाघीण, विनेश फोगाट हिचं भारतामध्ये स्वागत आणि अभिनंदन! रक्षाबंधनाला भाऊ बहिणीला भेट देतो. मात्र तू आम्हा सर्व भारतीयांची छाती अभिमानानं फुलून यावी अशी कामगिरी केली आहेस. तू जीवनातील प्रत्येक कसोटीमध्ये विजयी होत राहा, याच आमच्या शुभेच्छा. दरम्यान, हरणायाचे क्रीडामंत्री संजय सिंह यांनीबी विनेशला राजकारणात प्रवेश करण्यासाठी निमंत्रित केलं होतं. विनेशची इच्छा असल्यास तिला उमेदवारी देण्याचा विचार भाजपा करू शकतो, असे ते म्हणाले होते. मात्र भाजपा विनेशबाबत उघडपणे काहीही भूमिका घेत नाही आहे. तर विनेशबाबत काँग्रेस राजकारण करत आहे, अशी टीका हरयाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी यांनी केली होती.