विजयवाडा : ७९ व्या सीनिअर राष्ट्रीय बॅडिमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सहभागी न झालेली स्टार खेळाडू सायना नेहवालविरुद्ध भारतीय बॅडमिंटन महासंघाने (बाई) न्यायालयाचे दार ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.बाईचे महासचिव पुन्नेया चौधरी यांनी सांगितले की,‘सायना गेल्या चार वर्षांपासून एकाही राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेली नाही. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत खेळाडूंच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याची जबाबदारी सायना सारख्या स्टार खेळाडूंवर आहे, पण तिने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. सायना व पारुपल्ली कश्यप यांच्यासारखे आघाडीचे खेळाडू भारतात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेतून माघार घेत असल्याचे चित्र आहे. हे खेळाडू ईमेलला उत्तरही देत नाही. आम्ही या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात खेळाडू अशा प्रकारचा निर्णय घेताना विचार करतील.’चौधरी पुढे म्हणाले,‘मायदेशातील स्पर्धेत सहभागी न होणे नियमांचे उल्लंघन ठरते. आम्ही हा मुद्दा केंद्र सरकारच्या लक्षात आणून देणार आहोत. आघाडीच्या खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या आयोजकांना ३० ते ४० लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले. अन्य क्रीडा प्रकारात अशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत नाही. ही एक गंभीर बाब आहे.’सायनाने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते की, केरळमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व विजयवाडामध्ये प्रारंभ होत असलेल्या सीनिअर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार नाही. मी एक खेळाडू आहे मशिन नाही. मी वर्षभरात १२ ते १५ स्पर्धा खेळते. मला माझ्या शरीराच्या क्षमतेची कल्पना आहे. कुठल्या स्पर्धेत सहभागी व्हायचे, याची मी निवड करते. मी सध्या आॅगस्ट महिन्यात होणारी विश्वचॅम्पियन आणि त्यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी फिटनेस राखण्यावर भर देत आहे. त्यामुळे कुठल्याही स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घेते.(वृत्तसंस्था)